सांगवी पोलिसांची मोठी कारवाई; ३७ लाखांचा ७४ किलो गांजा जप्त, शिरूरच्या तस्कराला बेड्या
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २८ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
सांगवी: सांगवी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तस्कराला सांगवी पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून एकूण ३७ लाख ९ हजार रुपये किमतीचा ७४.१८ किलो ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याचा साथीदार फरार झाला आहे.
दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी रात्री सांगवी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार परिसरात गस्त घालत होते. यावेळी एका काळया रंगाच्या ‘शाईन’ मोटारसायकलवर एक तरुण पांढऱ्या रंगाचे पोते बांधून निर्जनस्थळी उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच तो पळून जाऊ लागला, मात्र पथकाने पाठलाग करून त्याला शिताफीने पकडले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गणेश कैलास चव्हाण (वय ३०, रा. गणेशगाव खलसा, ता. शिरूर) असे आहे. त्याच्या मोटारसायकलवरील पोत्याची झडती घेतली असता ७ लाख रुपये किमतीचा १४ किलो गांजा मिळून आला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी गणेश चव्हाणची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता, त्याने हा माल त्याचा साथीदार विनोद ज्ञानेश्वर झरे याने दिल्याचे सांगितले. विनोद झरे याने दौंड तालुक्यातील पाटेठाण येथील आपल्या राहत्या घराजवळील म्हशीच्या गोठ्यात आणखी गांजा लपवून ठेवल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानुसार पोलिसांनी पाटेठाण येथे छापा टाकून गोठ्यातून ३० लाख ९ हजार रुपये किमतीचा ६०.१८ किलो गांजा जप्त केला. या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत ७४.१८ किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) संदीप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल नांदेकर, उपनिरीक्षक महादेव भालेराव, रोहित पाटील, सुरेश हिंगे आणि पथकातील अंमलदार शिंदे, काळभोर, ढवळे, सुपे, गोडे, बनकर, खंडागळे, पाटील यांनी केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
