news
Home पिंपरी चिंचवड मुंबईत मराठीचा बाणा! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीकडून सत्कार

मुंबईत मराठीचा बाणा! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीकडून सत्कार

ओला-उबरवर लगाम आणि कल्याणकारी महामंडळाला गती देण्याचे मंत्र्यांचे आश्वासन; डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भेट | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मराठी भाषेच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मंत्रालयात विशेष गौरव

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २८ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

मुंबई: महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी आणि परिवहन विभागांतर्गत ऑटो-टॅक्सी चालक-मालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांचा मुंबई मंत्रालयातील त्यांच्या दालनात भव्य सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत व ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने कष्टकरी जनतेचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या हस्ते सरनाईक यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पगडी, उपरणे आणि पवित्र ‘गाथा’ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी डॉ. बाबा कांबळे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा उल्लेख करत सांगितले की, १०७ हुतात्म्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र मराठी भाषेच्या आधारावर निर्माण झाला आहे. मुंबईत मराठी भाषेला होणारा विरोध दुर्दैवी असून, अशा परिस्थितीत प्रताप सरनाईक यांनी घेतलेला मराठी सक्तीचा निर्णय ऐतिहासिक आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केल्याबद्दल कष्टकरी समाजाच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.

सत्कार सोहळ्यानंतर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्र्यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा केली:

  • ॲग्रीगेटर कंपन्यांवर लगाम: ओला-उबरसारख्या कंपन्यांकडून वाहन चालकांचे होणारे शोषण थांबवण्यासाठी लवकरच ‘ॲग्रीगेटर पॉलिसी’ला मान्यता देऊन दर निश्चित करण्यात येतील, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

  • कल्याणकारी महामंडळ: रिक्षा चालक-मालक कल्याणकारी महामंडळाच्या कामाला गती देऊन चालकांचा आरोग्य आणि विम्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येईल.

  • मुक्त परवाना धोरण: रिक्षा व्यवसायातील अनियंत्रित स्पर्धा रोखण्यासाठी ‘ओपन परमिट’ पद्धत बंद केल्याबद्दल संघटनेने मंत्र्यांचे आभार मानले.

  • सीएनजी हायड्रो टेस्टिंग: रिक्षाचालकांवरील सीएनजी बाटला टेस्टिंगचा आर्थिक भार कमी करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिले.

याप्रसंगी संघटनेचे अनिल शिरसाट (प्रमुख, रिक्षा ब्रिगेड), शुभम तांदळे (मुख्य संघटक), विशाल ससाने (पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष), प्रदीप आय्यार (विद्यार्थी वाहतूक विभाग), प्रकाश यशवंत (सचिव, टपरी-पाथरी पंचायत) यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

“परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषेबाबत घेतलेली भूमिका स्वाभिमान वाढवणारी आहे. या बैठकीमुळे राज्यातील लाखो रिक्षाचालकांच्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल.”

— डॉ. बाबा कांबळे, नेते, महाराष्ट्र रिक्षा पंचायत


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!