news
Home पिंपरी चिंचवड संत तुकाराम महाराज पालखी आगमनापूर्वी निगडी उड्डाणपुलाचे सुशोभीकरण करा; भाजपाचे सचिन काळभोर आक्रमक!

संत तुकाराम महाराज पालखी आगमनापूर्वी निगडी उड्डाणपुलाचे सुशोभीकरण करा; भाजपाचे सचिन काळभोर आक्रमक!

पानांच्या पिचकाऱ्यांमुळे वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांचे विद्रुपीकरण; मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे तात्काळ रंगरंगोटी करून बकालपणा दूर करण्याची निवेदनाद्वारे मागणी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखालील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची दुरावस्था; तातडीने रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्याची भाजपा कार्यकर्ते सचिन काळभोर यांची मनपा आयुक्तांकडे मागणी

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , २९ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड शहरात लवकरच आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर, निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून साकारलेल्या वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची मोठी दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी काही बेजबाबदार नागरिकांनी गुटखा व पानांच्या पिचकार्या मारून ही पवित्र तैलचित्रे खराब केली असून, परिसरात बकालपणा निर्माण झाला आहे. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी तातडीने नवीन तैलचित्र रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

आषाढी वारी आणि पालखी सोहळा हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि वारकरी बांधवांसाठी अत्यंत भक्तीचा आणि उत्साहाचा सोहळा असतो. पिंपरी चिंचवड शहरात पालखीचे स्वागत करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने दरवर्षी मोठी तयारी केली जाते. निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूल हा पालखी मार्गावरील एक मुख्य आणि महत्त्वाचा टप्पा आहे. या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा इतिहास आणि संस्कृती दर्शवणारी सुंदर तैलचित्रे मनपाने लाखो रुपये खर्च करून भिंतींवर व पुलाच्या खांबांवर साकारली होती.

परंतु, सध्या या तैलचित्रांची दुरवस्था झाली असून त्यावर थुंकून ती विद्रूप करण्यात आली आहेत. पालखी सोहळ्याच्या काळात लाखो वारकरी या मार्गावरून मार्गक्रमण करतात. अशा वेळी हे विद्रूप झालेले फलक आणि बकालपणा पाहून वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. हे निदर्शनास आणून देत भाजपा कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पालिका प्रशासनाने आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणात ताबडतोब लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

“संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या लाखो वारकरी बांधवांमध्ये भक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी निगडी उड्डाणपुलाखालील या जागेची स्वच्छता होणे गरजेचे आहे. मनपा प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून या ठिकाणी उत्कृष्ट तैलचित्रांची पुनर्रचना करावी, नवीन रंगरंगोटी करून संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करावे आणि यापुढे तिथे बकालपणा दिसणार नाही याची कडक दक्षता घ्यावी.” –सचिन काळभोर, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते, पिंपरी चिंचवड शहर.

पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने, प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता या संवेदनशील विषयावर युद्धपातळीवर काम करून निगडी उड्डाणपुलाला पूर्ववत चैतन्यमय रूप द्यावे, अशीच अपेक्षा सध्या समस्त शिवभक्त आणि वारकरी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!