सांगवी येथील ‘सरकार सेतू’ सुशोभीकरण कामात तब्बल १७ कोटींचा संभाव्य घोटाळा? विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी पुराव्यांसह उघडकीस आणली आर्थिक अनियमितता; पालिका आयुक्तांकडे स्वतंत्र चौकशीची मागणी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २९ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सांगवी येथील ‘सरकार सेतू’ पुलावरील रोषणाई व सुशोभीकरण कामात तब्बल १७ कोटी रुपयांची प्रचंड आर्थिक अनियमितता आणि घोटाळा झाल्याची खळबळजनक शक्यता विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी पुराव्यांसह उघडकीस आणली आहे. या प्रकल्पाच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अतोनात अपव्यय झाल्याचा थेट आरोप करत, भाऊसाहेब भोईर यांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक चौकशी करण्याची अधिकृत मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. नेहमीच जनतेच्या पैशांची उधळपट्टी रोखण्यासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी लढणारे नेते म्हणून भाऊसाहेब भोईर यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी या संदर्भात स्थापत्य प्रकल्प विभागाकडून अधिकृत माहिती (जा.क्र. स्था/प्रकल्प/५८/२०२६, दिनांक ०५/०५/२०२६) मागवून घेतली होती. मनपा प्रशासनाने दिलेल्या लेखी माहितीनुसार, या पुलाच्या रोषणाई व सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणात एम.एस. (MS) लोखंडी साहित्य वापरल्याचे दाखवले आहे. यामध्ये लोखंडी फ्रेम (MS) – ५४०.५८ MT, पाया काँक्रिटसाठी १५७.७३ MT, पाईप लाइनरसाठी ४४.४४ MT, आणि रेलिंगसाठी २२.७३ MT साहित्याचा समावेश आहे.
कर्तव्यदक्ष आणि अभ्यासू नेते भाऊसाहेब भोईर यांनी स्थानिक नागरिक आणि तांत्रिक तज्ज्ञांशी चर्चा करून या कामाची प्रत्यक्ष पडताळणी केली असता, धक्कादायक वास्तव समोर आले. पुलावरील लोखंडी फ्रेम व इतर सर्व लोखंडी साहित्याचे एकूण वजन प्रत्यक्षात ५० MT (५०,००० किलो) पेक्षा जास्त नसल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येत आहे.
डीएसआर (DSR) दरानुसार भाऊसाहेब भोईर यांनी या कामाचा वास्तविक खर्च खालीलप्रमाणे मांडला आहे:
-
एम.एस. साहित्य किंमत: ५०,००० कि.ग्रा. (दर ₹४९) = ₹२४,५०,०००/-
-
फॅब्रिकेशन व प्रोसेसिंग खर्च: ५०,००० कि.ग्रा. (दर ₹१८६) = ₹९३,००,०००/-
-
एकूण अंदाजित खर्च: ₹१,१७,५०,०००/- (१ कोटी १७ लाख ५० हजार)
याशिवाय, अत्याधुनिक एलईडी लाईट, सर्व विद्युत साहित्य, केबलिंग, नियंत्रण यंत्रणा, दर्जेदार रंगकाम, वाहतूक व इतर सर्व पूरक खर्च मोठ्या प्रमाणात विचारात घेतला, तरी संपूर्ण प्रकल्पाचा एकूण खर्च जास्तीत जास्त ₹५ कोटींपर्यंतच अपेक्षित दिसून येतो. मात्र, महापालिकेच्या दप्तरी या कामावर तब्बल ₹२२ कोटी खर्च झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल ₹१७ कोटींच्या अवाढव्य खर्चाबाबत गंभीर शंका निर्माण झाली असून, हा जनतेचा पैसा नेमका कोणाच्या खिशात गेला? असा रोखठोक सवाल विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी उपस्थित केला असून याचा तपशीलवार हिशोब तात्काळ सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.
सार्वजनिक निधीच्या रक्षणासाठी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात खालीलप्रमाणे कडक व तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे: १) स्वतंत्र तांत्रिक समितीमार्फत पुलावरील साहित्याचे प्रत्यक्ष मोजमाप व भौतिक पडताळणी करण्यात यावी. २) या संपूर्ण कामाचे स्वतंत्र आर्थिक लेखापरीक्षण (Third Party Audit) करण्यात यावे. ३) कामाचे मूळ अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका (MB), बिले, देयके व मंजुरी आदेश या सर्व कागदपत्रांची सखोल चौकशी करण्यात यावी.
हा संपूर्ण प्रकार थेट जनतेच्या करातून जमा झालेल्या सार्वजनिक निधीशी संबंधित असून अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी या पत्राची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्यावेत, अशी ठाम मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे. भाऊसाहेब भोईर यांच्या या जागरूक आणि तत्पर भूमिकेमुळे पिंपरी चिंचवडकरांमधून त्यांचे विशेष कौतुक होत असून, भ्रष्टाचाराविरोधातील त्यांचा हा लढा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
