आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न; ज्येष्ठ नागरिकांच्या कलागुणांचा आणि गुणवंतांचा विशेष गौरव
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , २९ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड : वाकड येथील पोस्टल कॉलनीतील ‘आनंद ज्येष्ठ नागरिक संघा’ची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजता हॉटेल बर्ड व्हॅलीच्या सभागृहात अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली. या सभेला उपस्थित सभासदांनी “आदर्श सभा” असा गौरव केल्याने संघाच्या उत्कृष्ट नियोजनाला आणि पारदर्शक कारभाराला नागरिकांची खरी पावती मिळाली आहे.
या सभेला प्रमुख पाहुण्या म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मा. स्वातीताई मयूर कलाटे आणि पिंपरी चिंचवड शहर ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा मा. वृषालीताई मरळ उपस्थित होत्या. त्यांच्यासह इतर ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि सुमारे २३० ते २४० सभासद या सोहळ्याला मोठ्या संख्येने हजर होते.

संघाचे अध्यक्ष श्री. भागवत कोल्हे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व सभासदांचे शब्दसुमनानी स्वागत केल्यानंतर सभेला सुरुवात झाली. सभेच्या सुरुवातीला संघामधून दिवंगत झालेल्या सभासदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मान्यवर आणि संघाचे पदाधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कला मंचातील महिला भगिनींनी अत्यंत सुमधुर सुरात गणेश वंदन, शारदा स्तवन आणि स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माजी नगरसेविका स्वातीताई कलाटे म्हणाल्या, “आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची वाटचाल खूप चांगल्या आणि आदर्श पद्धतीने सुरू आहे. संघातर्फे सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. या संघात महिलांची संख्या लक्षणीय असून त्यांच्यासाठी अनेक स्तुत्य कार्यक्रम घेतले जातात. या यशस्वी प्रवासाला माझ्या नेहमीच शुभेच्छा राहतील.” पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मा. मयूरभाऊ पांडुरंग कलाटे हे या संघाचे मुख्य आधारस्तंभ असून, त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच संघ आज यशस्वी वाटचाल करत असल्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख यावेळी करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषालीताई मरळ यांनी आपल्या भाषणात संघाच्या कामाचे कौतुक केले आणि वाकड परिसरातील या ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विरंगुळा केंद्र उपलब्ध नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. हा प्रश्न सोडवण्यासाठी आणि संघाला लवकरच हक्काचे ‘विरंगुळा केंद्र’ मिळवून देण्यासाठी मी शासनाकडे व पालिकेकडे प्राधान्याने प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
संघातील वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या अमृतमहोत्सवी ज्येष्ठ सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते आदराने सत्कार करण्यात आला. यामध्ये मुरलीधर लहाने, श्रीकांत रेवणवार, मनोहर चौधरी, भास्कर आगलावे, शिवाजी सिद्धांति, निवृत्ती पाटील, अरुण काळे, शशिकला पेडणेकर, शालिनी नारखेडे, मंजू पटवर्धन, पारूबाई पवार, देवयानी जोशी व मीरा बोरकर यांचा समावेश होता.
समाजासमोर एक उत्तम आदर्श निर्माण करणाऱ्या विविध क्षेत्रातील गुणवंतांचा या सभेत विशेष सत्कार करण्यात आला:
-
योग क्षेत्र: समाजात आरोग्याचा संदेश देणारे ज्ञानेश्वर गिरमे, रेखा गिरमे आणि माधव बराटे यांचा ‘योग गुरू’ म्हणून विशेष सन्मान करण्यात आला.
-
आंतरराष्ट्रीय व क्रीडा क्षेत्र: आंतरराष्ट्रीय खुराश इन्स्टिट्यूट (Kuraish Institute) मध्ये तज्ज्ञ म्हणून निवड झालेले डॉक्टर संतोष तेली आणि युरोपियन पातळीवर जुडो (Judo) क्रीडा प्रकारात कांस्य (Broze) पदक मिळवून देशाचे नाव उंचावणाऱ्या शिल्पा तेली यांचा गौरव करण्यात आला.
-
वैद्यकीय क्षेत्र: भारतातील त्वचेवर काम करणाऱ्या सर्वोच्च राष्ट्रीय संस्थेमध्ये निवड झाल्याबद्दल प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर नंदिनी तेली यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
यानंतर सभेपुढील विविध विषय व अहवाल वाचनात आले, ज्यांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. कार्यक्रमाचे नेटके आणि प्रभावी सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गिरमे यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन आणि सामूहिक पसायदान झाल्यानंतर सर्व उपस्थित सभासदांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यानंतरच सभेचे विसर्जन झाले.
या संपूर्ण सभेच्या भव्य नियोजनासाठी आणि यशस्वीतेसाठी संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर लहाने, सचिव सुरेश बोरकर, सहसचिव आप्पासाहेब तेली आणि खजिनदार माधव बराटे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. कळमकर, श्री. कुलकर्णी आणि श्री. देसाई यांचेही या कार्यक्रमात मोलाचे सहकार्य लाभले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
