सांगवी-दापोडीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेची युद्धपातळीवर पावले! तक्रारींची दखल घेत वितरणाचे वेळापत्रक पाळण्याचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांचे आदेश
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १८ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: सांगवी आणि दापोडी परिसरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या तीव्र नाराजीची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. या भागातील पाणीपुरवठा अधिक नियमित, पारदर्शक आणि निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार करण्यासाठी महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन वितरण व्यवस्थेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांत सांगवी व दापोडीतील काही अंतर्गत भागांत अपुरा आणि अनियंत्रित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने परिसरातील मुख्य जलवाहिन्या, उंच जलकुंभ (पाण्याच्या टाक्या) आणि संपूर्ण वितरण यंत्रणेचे तांत्रिक परीक्षण केले आहे.
प्रशासनाने तातडीने घेतलेले मुख्य निर्णय पाण्याच्या टाक्यांवर (जलकुंभ) वितरणाच्या वेळी नियमित कर्मचारी उपलब्ध राहतील, जेणेकरून व्हॉल्व्ह सोडण्यास उशीर होणार नाही. पाण्याचे निश्चित केलेले वेळापत्रक पाळले जाईल आणि नागरिकांना पूर्वकल्पना न देता पाणी कपात केली जाणार नाही. ज्या भागात तांत्रिक अडचणी आहेत, तिथे तात्काळ मनुष्यबळ वाढवून देखरेख मजबूत केली जात आहे.
केवळ पाणीपुरवठा सुरळीत करणेच नव्हे, तर नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यावरही महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी जलकुंभांची नियमित स्वच्छता करणे, पाण्याच्या नमुन्यांची सातत्याने प्रयोगशाळेत तपासणी करणे आणि संपूर्ण वितरण यंत्रणेवर सतत देखरेख ठेवण्याचे काम सुरू आहे. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हेच महापालिकेचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश बरीदे यांनी सांगितले की, “सांगवी व दापोडी परिसरातील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली असून, वितरण व्यवस्थेतील सर्व तांत्रिक त्रुटी दूर करून नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आमचे अधिकारी प्रत्यक्ष कार्यरत आहेत.”
“प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत, नागरिकांना त्रास होऊ देणार नाही” – सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले:
“सांगवी व दापोडी परिसरातील पाणीपुरवठा अधिक नियमित, पारदर्शक आणि वेळापत्रकानुसार करण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून जलकुंभ, जलवाहिन्या आणि पाणीपुरवठा प्रक्रियेवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.”
महानगरपालिकेने नागरिकांनाही पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाणीपुरवठ्याबाबत काहीही अडचण किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालय अथवा थेट पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
