“नारायण सुर्वे हे कवितेतील सूर्य; त्यांची कविता मानवमुक्तीची!” – ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस; प्रा. सुरेखा कटारिया यांना ‘जीवनगौरव’ तर सामाजिक कार्यकर्ते रोहित खर्गे यांना ‘भला माणूस’ पुरस्कार प्रदान
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १८ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: “कविवर्य नारायण सुर्वे हे मराठी साहित्यातील आणि कवितेतील सूर्य होते. त्यांनी आयुष्यभर सोसलेल्या वेदनेतून निर्माण झालेली कविता ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून ती खऱ्या अर्थाने मानवमुक्तीचा जाहीरनामा आहे,” असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
चिंचवड येथील सायन्स पार्क सभागृहात शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०२६ रोजी नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने आयोजित ‘पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर आणि सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रांतील दिग्गजांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर होते.
पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या सोहळ्यात मानाच्या पुरस्कारांचे वितरण डॉ. श्रीपाल सबनीस आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कारार्थींची नावे पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान: ज्येष्ठ साहित्तीका प्रा. सुरेखा कटारिया, मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे सन्मान: वर्षा भोरे (उद्योजक व कृषिभूषण सुदाम भोरे यांच्या सहधर्मचारिणी), पद्मश्री नारायण सुर्वे ‘भला माणूस’ पुरस्कार: सामाजिक कार्यकर्ते रोहित खर्गे, पद्मश्री नारायण सुर्वे विचारसाधना पुरस्कार: ज्येष्ठ साहित्तीका पल्लवी बनसोडे परुळेकर, पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान: कवी राजू जाधव. व्यासपीठावर नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, स्वानंद महिला संस्थेच्या अध्यक्षा शोभा बंब आणि राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त कवी सीताराम नरके यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, “नारायण सुर्वे हे संस्कृतीच्या शहाणपणाला मौनात पाठविणारे महान व्यक्तिमत्त्व होते. जन्मापासून अनेक सामाजिक आणि वैयक्तिक अन्याय सोसूनही त्यांच्या कवितेत कुठेही कडवटपणा आला नाही; उलट त्यांनी आपल्या साहित्यातून मातृत्वाचा आणि श्रमिकांचा गौरव केला.”
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना भाऊसाहेब भोईर भावूक झाले. ते म्हणाले, “माणूस बुद्धीने श्रीमंत होऊ शकतो, पण केवळ पैशाच्या श्रीमंतीने कोणी बुद्धिवंत होत नाही. कविवर्य नारायण सुर्वे मला अत्यंत प्रेमाने ‘पोट्ट्या’ म्हणून हाक मारायचे, ही त्यांनी मला दिलेली श्रीमंती मी जगातील कशातही मोजू शकत नाही.”
“पारंपरिक संस्कार असलेल्या कुटुंबात सहजीवनाचा सुंदर अनुभव घेतला. लग्नानंतर स्वतः उच्च शिक्षण घेऊन मुलांनाही घडवले. जगण्यातला आनंद घेताना समाजालाही सामावून घेण्याचा प्रयत्न केला.”-प्रा. सुरेखा कटारिया
“आजवरच्या सामाजिक आणि वैयक्तिक प्रवासात मला लाभलेल्या नि:स्वार्थी मित्रांमुळे मी नेहमी स्वाभिमानाने जगू शकलो. त्यामुळे माझा हा ‘भला माणूस’ पुरस्कार प्रत्यक्षात माझ्या सर्व मित्रांचाच आहे.”- रोहित खर्गे
“मोठ्या एकत्र कुटुंबात वावरताना स्वतःला उन्हात झाड बनून उभे राहावे लागते, हीच माझ्या आई-वडिलांनी दिलेली मोठी शिकवण आहे.”- वर्षा भोरे
प्रामाणिकपणे केलेल्या कामाची समाजात नेहमीच दखल घेतली जाते, अशी भावना पल्लवी बनसोडे यांनी व्यक्त केली, तर कामाची कधीही लाज बाळगली नाही, अशी प्रांजळ कबुली राजू जाधव यांनी दिली.- पल्लवी बनसोडे व राजू जाधव
कार्यक्रमाची सुरुवात बाजीराव सातपुते यांच्या प्रास्ताविकाने झाली. सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभरात आयोजित केलेल्या कार्यक्रमांतील हे १० वे पुष्प असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर झालेल्या ‘नारायण सुर्वे काव्यजागर’ कविसंमेलनात कवी राजेंद्र वाघ, जयश्री श्रीखंडे, प्रभाकर वाघोले, स्वाती भोसले आणि सीमा गांधी यांनी सुर्वेंच्या विविध कवितांचे अत्यंत प्रभावी सादरीकरण करून रसिकांची टाळ्यांची दाद मिळवली.
या सोहळ्यात हुशार विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक शिक्षकांसह सत्कार करण्यात आला, तसेच आगामी सोळाव्या ‘स्वानंद साहित्य संमेलनाच्या’ अधिकृत बोधचिन्हाचे (Logo) अनावरण करण्यात आले.
या सोहळ्याचे सुंदर सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले, पुरस्कारार्थींशी संवाद पुरुषोत्तम सदाफुले यांनी साधला, संगीता झिंजुरके यांनी कविसंमेलनाचे निवेदन केले आणि अरुण गराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंद्रजित पाटोळे, जयवंत भोसले, महेंद्र भारती, प्रा. प्रभाकर दाभाडे, कुमार खोंद्रे, सुप्रिया सोळांकुरे, प्रदीप गांधलीकर आणि स्वानंद महिला संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
