दिल्ली पोलिसांची रात्री ३ वाजता गुप्त बैठक; पांढरा पडदा अन् जॅमर लावून अवघ्या ३० सेकंदांत सोनम वांगचुक यांना जंतरमंतरवरून हटवले! दिल्लीत मध्यरात्री ‘हाय व्होल्टेज ड्रामा’
दिल्ली, १८ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
दिल्ली: दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी पदभार स्वीकारताच राजधानीत मोठी कारवाई केली आहे. जंतरमंतर मैदानावर गेल्या २१ दिवसांपासून उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी शनिवार, १८ जुलै रोजी पहाटे अत्यंत नाट्यमय आणि गुप्त पद्धतीने आंदोलनस्थळावरून हटवले. कोणालाही सुगावा लागू नये म्हणून पोलिसांनी अवघ्या ‘३० सेकंदांचा’ मास्टरप्लॅन तयार केला होता. यासाठी परिसरात फोन जॅमर लावण्यापासून ते आंदोलनस्थळाभोवती पांढरा पडदा उभारण्यापर्यंतची गुप्तता पाळण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नवी दिल्ली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना (SHOs) एक तातडीचा निरोप धाडण्यात आला. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पहाटे ३ वाजता संसदेजवळ ‘सुरक्षेचा सराव’ (Security Drill) होणार असल्याचे सांगून सर्वांना प्रत्येकी १० पोलिसांसह बोलावण्यात आले होते.
सर्व पोलीस ठरलेल्या वेळेत पोहोचल्यानंतर त्यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे पोलीस उपायुक्त (DCP) सचिन शर्मा यांनी खरी माहिती दिली. “हा कोणताही सराव नसून सोनम वांगचुक यांना जंतरमंतरवरून हटवायचे आहे आणि हे काम अवघ्या ३० सेकंदांत पूर्ण करायचे आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली.
गेल्या वेळी अशाच एका कारवाईचे नियोजन लीक झाल्यामुळे यावेळी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच या प्लॅनची माहिती होती.पोलिसांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलकांवर पाळत ठेवली होती. शनिवारी पहाटे ६:३० च्या सुमारास पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके हे काही मिनिटांसाठी जवळच्या स्वच्छतागृहात गेले. नेमकी हीच वेळ पोलिसांनी कारवाईसाठी निवडली. दिपके बाहेर जाताच पोलिसांनी संपूर्ण परिसराची मोबाईल नेटवर्क संपर्क यंत्रणा तोडण्यासाठी ‘फोन जॅमर’ लावला. त्यानंतर स्टेजभोवती तातडीने एक मोठा पांढरा पडदा लावण्यात आला, जेणेकरून बाहेरून कोणालाही आत काय चालले आहे हे दिसणार नाही. पडद्याच्या आडोशाने ४ ते ५ पोलीस कर्मचाऱ्यांनी अवघ्या दोन मिनिटांत सोनम वांगचुक यांना उचलले आणि आधीच ‘केरल हाऊस’जवळ सज्ज ठेवलेल्या रुग्णवाहिकेतून (Ambulance) थेट सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि परीक्षा पद्धतीत मोठ्या सुधारणांसाठी सोनम वांगचुक हे २८ जूनपासून ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या बॅनरखाली आमरण उपोषणाला बसले होते. देशभरात झालेल्या विविध परीक्षांच्या पेपर फुटीच्या प्रकरणांमुळे हे आंदोलन तीव्र झाले होते. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांसह अनेक विरोधी पक्षांनी वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
विशेष म्हणजे, कालच केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेत दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोल्छा यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी अनुराग कुमार यांची नियुक्ती केली होती. गोल्छा यांना जंतरमंतरवरील आंदोलन योग्य रीतीने हाताळता आले नाही, याच कारणास्तव हटवण्यात आल्याची चर्चा आहे. पदभार स्वीकारताच नवे आयुक्त अनुराग कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि सोनम वांगचुक यांना हटवण्याची रणनीती आखून ती यशस्वीपणे राबवली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
