पुणे मेट्रोच्या गलथान कारभारावर राष्ट्रवादी अर्बन सेलचे शहराध्यक्ष (अजित पवार गट) प्रदीप गायकवाड आक्रमक! चिंचवडचे आमदार शंकरशेठ जगताप यांच्या ‘त्या’ मेट्रो प्रवासावरून लगावला टोला; प्रवाशांच्या ५ प्रमुख समस्या मांडत प्रशासनाला दिले धोक्याचे संकेत
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , १८ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे / पिंपरी-चिंचवड: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची लाईफलाईन ठरत असलेल्या ‘पुणे मेट्रो’च्या प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध गंभीर समस्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) अर्बन सेलचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. चिंचवड विधानसभेचे विद्यमान आमदार मा.श्री. शंकरशेठ जगताप यांनी नुकत्याच केलेल्या दापोडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रवासाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, प्रदीप गायकवाड यांनी आमदारांच्या या ‘अर्धवट’ प्रवासावर थेट बोट ठेवत प्रवाशांच्या मूलभूत प्रश्नांकडे त्यांचे व मेट्रो प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
शहरातील सामान्य नागरिक, जेष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाच्या हक्कासाठी नेहमीच रस्त्यावर उतरून आवाज उठवणारे नेते म्हणून प्रदीप गायकवाड यांची ओळख आहे. याही वेळी त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट न करता, मेट्रो प्रकल्पातील तांत्रिक व पायाभूत त्रुटींवर बोट ठेवून प्रशासनाला खडबडून जागे केले आहे.
प्रदीप गायकवाड यांनी सर्वप्रथम मेट्रोच्या वाहनतळाच्या समस्येला हात घातला. मेट्रो प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि ज्येष्ठ नागरिक संघांनी प्रत्येक मेट्रो स्टेशनला वाहनतळ उभारण्याची मागणी केली होती. मूळ नकाशात वाहनतळ गायब असल्याचे गायकवाड यांनी अधोरेखित केले. आज पिंपरी येथील वल्लभनगर येथे वाहनतळ उपलब्ध आहे, मात्र तिथली अवस्था अत्यंत दयनीय आहे. या वाहनतळावर ना सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, ना सुरक्षा रक्षक आणि ना वाहनांची जबाबदारी घेणारा कोणी जबाबदार कर्मचारी! प्रवाशांची वाहने अक्षरशः रामभरोसे सोडून दिली आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या आवारात मेट्रोचा सरकता जिना (इलेव्हेटर) घुसवण्यात आला आहे. परंतु, तेथील सुरक्षा रक्षक सामान्य प्रवाशांना आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या जिन्यावरून आत जाण्यास मज्जाव (प्रतिबंध) करतात. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे वयस्कर प्रवाशांचे अतोनात हाल होत असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मेट्रो सेवा सुरू करताना प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी मेट्रो स्टेशनबाहेर ‘शेअर रिक्षा’ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ही योजना अपयशी ठरली आहे. मेट्रो स्टेशनबाहेर रिक्षाचालक प्रवाशांकडून मनमानी आणि अव्वाच्या सवा भाडे आकारत आहेत, ज्यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही.
मेट्रोच्या सुरुवातीपासूनच ‘सर्व्हर डाऊन’ असण्याचा शाप प्रवाशांच्या पाचवीला पूजला आहे. डिजिटल तिकीट काढताना किंवा पास स्कॅन करताना वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने प्रवाशांना रांगेत उभे राहून ऑफलाईन तिकीट काढावे लागते. यामध्ये नोकरदार आणि विद्यार्थ्यांचा प्रचंड वेळ वाया जातो.
गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवाचा दाखला देत प्रदीप गायकवाड यांनी प्रशासनाच्या नियोजनावर तीव्र आक्षेप घेतला. गेल्या वर्षी केवळ ३ रांगा सुरू ठेवल्यामुळे मेट्रो स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होऊन गैरसोय झाली होती. यंदाच्या गणेशोत्सवात गर्दीचे योग्य नियंत्रण करण्यासाठी किमान ५ स्वतंत्र रांगा तयार कराव्यात, अशी महत्त्वपूर्ण मागणी त्यांनी केली आहे.
आमदार शंकरशेठ जगताप यांच्या मेट्रो प्रवासावर बोलताना प्रदीप गायकवाड म्हणाले,
“शेठ! तुम्ही दापोडी ते शिवाजीनगर असा मेट्रोचा प्रवास केल्याचा व्हिडिओ पाहिला. पण कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन केवळ अर्धा प्रवास करून उपयोग नाही. खरा प्रवास पिंपरी ते स्वारगेट असा पूर्ण करायला हवा होता, तरच मेट्रोच्या खऱ्या समस्या समजल्या असत्या. प्रवासादरम्यान सामान्य प्रवाशांशी चर्चा करा, म्हणजे तुम्हाला त्यांच्या अडचणी कळतील. मेट्रो प्रकल्पातील या अनेक त्रुटी जर लवकर मार्गी लागणार असतील, तरच तुमचा हा प्रवास प्रवाशांच्या सोयीसुविधा जाणून घेण्यासाठी होता असे म्हणता येईल; अन्यथा हा प्रवास केवळ चारचाकी गाडीत बसून कंटाळा आला म्हणून केला होता, हे लवकरच स्पष्ट होईल.”
प्रदीप गायकवाड यांनी अत्यंत अभ्यासूपणे आणि पुराव्यासहित मेट्रोच्या त्रुटींवर प्रहार केल्यामुळे आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे मेट्रो प्रशासन यावर काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. गायकवाड यांच्या या जनहितार्थ भूमिकेचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
