वन वैभव फॉरेस्ट कॉलनीत आषाढी एकादशीनिमित्त श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भक्तिभावात संपन्न; महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ!
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. २ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: अमरावती येथील वन वैभव फॉरेस्ट कॉलनी गृहनिर्माण संस्था अंतर्गत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त दि. १९ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सप्ताह अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला.
सप्ताहभर ह.भ.प. श्री गणेश गिरी महाराज यांच्या अमृतवाणीतून श्री ज्ञानेश्वरीचे पारायण पार पडले. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त पारायण पूर्ण करणाऱ्या भाविकांना महाराजांच्या शुभहस्ते ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे वितरण करण्यात आले. सप्ताहाचा प्रारंभ ह.भ.प. श्री भरत रेळे महाराज यांच्या समाजप्रबोधनपर सप्त खंजिरी कीर्तनाने झाला, तर दररोज सायंकाळी श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, शेंदोळा (बु.) व परिसरातील विविध भजन मंडळांच्या सुरेल भजनांनी संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजरात दुमदुमून गेला होता.
दि. २५ जुलै रोजी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी माऊलींची भव्य पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. पालखीचा संपूर्ण मार्ग आकर्षक रांगोळ्या आणि फुलांच्या पायघड्यांनी सजवण्यात आला होता. ठिकठिकाणी नागरिकांनी व भाविकांनी पालखीचे भावपूर्ण पूजन करून स्वागत केले. या सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी झाल्याने वन वैभव परिसरात जणू पंढरपूरच अवतरल्याचे दृश्य निर्माण झाले होते.
रविवार, दि. २६ जुलै रोजी ह.भ.प. श्री गणेश गिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या धार्मिक सप्ताहाची सांगता झाली. या कीर्तनाला मृदंगाचार्य विक्रमभाऊ काठोडे आणि हार्मोनियमवादक मनोजभाऊ झाडे यांनी अप्रतिम साथसंगत केली. काल्याच्या कीर्तनानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
या संपूर्ण धार्मिक सोहळ्याचे नेटके आयोजन वन वैभव फॉरेस्ट कॉलनी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर भारसाकडे, उपाध्यक्ष श्री चंद्रकांत पुसदकर, सचिव श्री रमेश बोके आणि श्रीहरी ग्रुपचे अध्यक्ष श्री संजय गुहे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सुनील काकडे, श्री गडपल्लीवार, श्री कोल्हे, श्री पातोंड, श्री अमृतकर, श्री बानुबाकोडे, श्री संजय भारसाकडे व मित्रपरिवार, श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, श्री गजानन महाराज महिला भजन मंडळ, तसेच परिसरातील महिला व युवकांनी विशेष परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


