81
पुजद्यात महिलांनी फुंकले परिवर्तनाचे रणशिंग; ‘महिला राजसत्ता’ आंदोलनाच्या गावशाखेचा दिमाखदार शुभारंभ, अंधश्रद्धेविरोधात विवेकाचा जागर
अमरावती / पिंपरी प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. २८ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: “सांदी-कोपऱ्यात राहायचं नाही, राज्य करायला भ्यायचं नाही!” आणि “विवेकाचा आवाज बुलंद करूया!” अशा जोशपूर्ण घोषणांनी अमरावती जिल्ह्यातील पुजदा गाव दुमदुमून गेले. महिलांचे नेतृत्व, राजकीय सहभाग आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा निश्चित करणाऱ्या महिला राजसत्ता आंदोलनाच्या पुजदा गावशाखेचा फलक उद्घाटन सोहळा, महिलांसाठी राजसत्ता आंदोलनाची कार्यशाळा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) वतीने अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
गावाच्या मुख्य रस्त्यालगत महिला राजसत्ता आंदोलनाच्या गावशाखेच्या फलकाचे उद्घाटन सरपंच उज्वलभाऊ दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महा. अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव विजय डवरे, महिला राजसत्ता आंदोलनाच्या जिल्हा समन्वयक प्रतिभा खापरे यांच्यासह गावशाखेतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

फलक उद्घाटनानंतर ग्रामपंचायत कार्यालयात महिलांसाठी विशेष कार्यशाळा घेण्यात आली. महिलांनी केवळ घर आणि कुटुंबापुरते मर्यादित न राहता गावाच्या विकासाच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले नेतृत्व प्रभावीपणे उभे करावे आणि सामाजिक प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठवावा, असे आवाहन करण्यात आले.
याच कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अंधश्रद्धा, रूढी-परंपरा आणि अवैज्ञानिक समजुतींविरोधात वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकाची भूमिका मांडत समितीची पंचसूत्री महिलांना समजावून सांगण्यात आली.

कार्यक्रमात महिला राजसत्ता आंदोलनाच्या पुजदा गावशाखेची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष अनुराधा गोफने , उपाध्यक्ष सुषमा रहाटे , सचिव शीतल शिंदे , कोषाध्यक्ष प्रिया इंगळे , नेतृत्वशील महिला वर्षा भुजाडे , संघटिका प्रणिता वानखडे , सहसंघटिका सविता नागदिवे, सदस्य अपर्णा झाडे, पूनम चोरे, उषा काकडे, नाजमीन अशफाक अली, अंजुम बानो शेख शादिक, वाहिद अंजुम साजिद मुल्ला, रुकसाना इरफानोद्दीन आणि हीना अफसर अली.
कार्यक्रमात महाराष्ट्र अंनिस व संविधान जागर अभियानाच्या वतीने महिलांना ‘शिवाजी महाराज’ हे पुस्तक तसेच संत गाडगेबाबांची दशसूत्री असलेली पत्रके वितरित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उज्वल दळवी होते. प्रमुख उपस्थितीत उपसरपंच अरुणभाऊ शिंदे, प्रशासक सदस्य अपर्णा झाडे, अंनिस जिल्हा प्रधान सचिव विजय डवरे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर, संजय खापरे, अंनिस पुजदा शाखा कार्याध्यक्ष राहुल वाघमारे, देवरा शाखा कार्याध्यक्ष सौरभ देशमुख आणि जिल्हा समन्वयक प्रतिभा खापरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा खापरे यांनी केले, राहुल वाघमारे यांनी परिचय करून दिला, तर सुषमा रहाटे यांनी आभार मानले. महिलांच्या या संघटित पाठिंब्यामुळे पुजदा परिसरात सामाजिक सहभागाची नवी पहाट निर्माण झाली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
