अलंकापुरीत ज्ञानेश्वरीचा जयघोष! संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ!
आळंदी: श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. उत्साही, मंगलमय आणि धार्मिक वातावरणात अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला. डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते हरिनाम गजरात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा शुभारंभ झाला आणि हजारो वारकरी, भाविकांनी या पवित्र सोहळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या मंगल सोहळ्याच्या पहाटेच्या उद्घाटनाप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, डॉ. नारायण महाराज जाधव, श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, आमदार बापूसाहेब पठारे, मुक्ताईनगर देवस्थानचे प्रमुख रवींद्र भैय्या पाटील, पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त राजेंद्र उमाप, डॉ. भवार्थ देखणे, चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, विश्वस्त रोहिणी पवार, विश्वस्त पुरुषोत्तम दादा पाटील, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, वैजयंती उमरगेकर, बबनराव कुऱ्हाडे, नंदकुमार कुऱ्हाडे, संजय घुंडरे यांसारख्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. आळंदी ग्रामस्थ आणि असंख्य वारकरी, भाविक यांनी या पवित्र क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
सोहळ्याचे उदघाटन विणा पूजन, प्रतिमा पूजन आणि वेदमंत्रांच्या जयघोषात दीप प्रज्वलनाने झाले. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातील ग्रंथाचे पूजन प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांच्या हस्ते हरिनाम जयघोषात संपन्न झाले. यानंतर पारायणाचे नेतृत्व कोष्टी महाराज यांनी आपल्या मधुर वाणीतून केले. पहिल्या दिवशी पहिले तीन अध्याय वाचण्यात आले.
आळंदी नगरी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. विविध ठिकाणी आकर्षक कमानी उभारण्यात आल्या आहेत, तर माऊली मंदिरावर मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांना या धार्मिक पर्वाचा अनुभव घेण्यासाठी आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. श्री ज्ञानेश्वरी परिवाराच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक महिला बचत गटांतील महिला, शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनीही या पारायण सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला आहे.
या सप्ताहात पहाटे सहा ते रात्री अकरा या वेळेत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, चरित्र कथा चिंतन, प्रवचन, हरिपाठ आणि संगीत भजन यांचा समावेश असणार आहे. या ज्ञानयज्ञात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. आळंदी देवस्थानच्या वतीने माऊलींची प्रतिमा देऊन उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
ज्ञानेश्वरी आचरणात आली पाहिजे – ना. चंद्रकांत पाटील:
याप्रसंगी बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या सोहळ्यास आपल्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास एवढ्या पहाटेपासून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत, हे पाहून आनंद झाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साडेसातशे व्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त तसेच संत नामदेवांच्या ६७५ व्या समाधी वर्षे आणि संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या सदेह वैकुंठ गमना वर्ष पूर्तीनिमित्ताने हा त्रिवेणी संगम जुळून आला आहे आणि येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होत आहे. या सोहळ्याच्या आयोजनात संस्थान आणि गावकरी यांचा समन्वय दिसत आहे, त्याबद्दल खूप आनंद आहे. ज्ञानेश्वरीवर बोलण्याची माझी पात्रता नाही, मात्र ज्ञानेश्वरी माझ्या अगदी जवळची आहे. माझ्या वडिलांनी, जे निरक्षर होते, त्यांनी लहानपणी मला ज्ञानेश्वरी वाचण्याचा आग्रह केला आणि तेव्हापासून माझ्यावर त्याचा प्रभाव आहे. ज्ञानेश्वरी वाचताना ती समजली पाहिजे आणि आचरणातही आणली पाहिजे. समजल्याशिवाय आचरणात आणता येत नाही,” असे सांगत ते दहा मिनिटे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायणात ज्ञानेश्वरी वाचण्यास बसले.
अलंकापुरी आज ज्ञानेश्वर माऊलींच्या नामघोषाने आणि भक्तीरसाने ओतप्रोत झाली आहे. या पवित्र वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने आळंदीत दाखल झाले आहेत.
तुम्हाला या सोहळ्याबद्दल काय वाटते? कमेंटमध्ये नक्की कळवा!
