Home मावळमहाराष्ट्र खडसेंचा चाकणकरांना टोला: ‘तुमचे घोडे निघाले, पण वरातीनंतर!’

खडसेंचा चाकणकरांना टोला: ‘तुमचे घोडे निघाले, पण वरातीनंतर!’

वैष्णवी प्रकरणी राष्ट्रवादीत जुंपली; सुपेकरांवरही गंभीर आरोप!

by maxmanthannews@gmail.com

पुणे (मॅक्स मंथन डेली न्यूज): पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. “तुमचे घोडे निघाले, पण वरातीनंतर!” अशा शब्दांत त्यांनी रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रोहिणी खडसे म्हणाल्या, “छगन भुजबळ यांच्या शपथविधीच्यावेळी रुपाली चाकणकर या त्यांच्या स्वागतासाठी सर्वात पुढे होत्या. त्यावेळी त्या वैष्णवी प्रकरणावर काहीही बोलल्या नाहीत. आता मात्र त्यांचे वरातीमागून घोडे नाचवत आहेत.” रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी पोलिसांना वैष्णवी हगवणे प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर रोहिणी खडसे यांनी ही टीका केली आहे.

“सत्तेतील सर्वच लोक आपला म्हणून हगवणेला वाचवत आहेत. त्यामुळेच आरोपी अजूनही सापडत नाहीत,” असा आरोपही रोहिणी खडसेंनी केला आहे. “भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेत होते तेव्हा रुपाली चाकणकर यांनी वैष्णवी प्रकरणावर कुठलेही भाष्य केले नाही. नंतर ही जबरदस्तीची प्रतिक्रिया त्या देत आहेत,” असेही खडसेंनी म्हटले आहे. “वैष्णवी संशयास्पद मृत्यूचे प्रकरण पुण्यातील आहे. हगवणे हा अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे,” असेही खडसे यांनी नमूद केले आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरण काय?

वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) या विवाहितेने सासरकडून पैशांसाठी सततच्या तगाद्यावरून व छळाला कंटाळून १६ मे रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती. वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांच्या तक्रारीनुसार, वैष्णवीच्या लग्नात ५१ तोळे सोने, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. वैष्णवीच्या उत्तरीय तपासणी अहवालात तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले आहेत. वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे अद्याप फरार आहेत.

जळगावचे माजी पोलिस अधीक्षक जालिंदर सुपेकरही गोत्यात:

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी तसेच जळगावचे माजी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांचेही नाव आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुपेकरांवर गंभीर आरोप केले आहेत. सुपेकर हे वैष्णवीच्या सासूबाईचे बंधू अर्थात तिच्या पतीचे मामा आहेत. सुपेकर यांच्या नावाचा वैष्णवीच्या माहेरच्यांना नेहमी धाक दाखवला जात असल्याचा आरोप हगवणेंची दुसरी सून मयुरी देशमुख यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. नंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करीन सुपेकर यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. सुपेकर हे सध्या कारागृहाचे विशेष पोलीस महानिरिक्षक आहेत.

“असले नालायक माझ्या पक्षात नको”: अजितदादा पवार

“वैष्णवी हगवणे हा माझ्या पक्षाचा सदस्य असेल तर त्याची हकालपट्टी झालेली आहे. असले नतद्रष्ट लोक माझ्या पक्षात नकोतच,” अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे. “मी फक्त लग्नाला हजेरी लावली होती. जे फरार आहेत ते लवकरच पकडले जातील,” असेही अजितदादांनी स्पष्ट केले. “मी संबंध आणि नात्यांपेक्षा मूल्ये आणि माणुसकीला वर मानणारा आहे, असल्या प्रकारची व्यक्ती कुणीही असेल तर त्याची गय करणार नाही,” असेही ते म्हणाले.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!