Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड मनपाचा तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर; केंद्र सरकारकडून कौतुक!

पिंपरी-चिंचवड मनपाचा तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर; केंद्र सरकारकडून कौतुक!

नागरी सेवा सुलभीकरणासाठी उचललेले पाऊल ठरले आदर्श. (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी)

by maxmanthannews@gmail.com

पिंपरी-चिंचवड मनपात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर; केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाकडून कौतुक!

(मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी): पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासकीय कामांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत असल्यामुळे नागरी सेवा अधिक सुलभ आणि पारदर्शक झाल्या आहेत, असे गौरवोद्गार भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव संकेत भोंडवे यांनी काढले. त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज, सोमवार (२६ मे २०२५) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला भेट दिली.

या महत्त्वपूर्ण भेटीत मध्य प्रदेशातील इंदूर महानगरपालिकेचे आयुक्त शिवम वर्मा, अतिरिक्त आयुक्त अभिलाष शर्मा, रेवा महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ सोनवणे आणि मध्य प्रदेश सरकारच्या नगर विकास आणि प्रशासन विभागाचे अपर आयुक्त डॉ. परिक्षित झाडे यांचा समावेश होता. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी आयुक्त तथा पुण्याचे माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले आणि त्यानंतर त्यांनी मनपात माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करून चालवल्या जाणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांची विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मकरंद निकम, नगर रचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, उप अभियंता सुनिल पवार आणि दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संकेत भोंडवे यांनी मनपाच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रशासकीय कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत प्रभावीपणे केला जात आहे, हे येथे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांवरून स्पष्टपणे दिसून येते. यामुळे महापालिकेचे कामकाज अधिक गतिमान आणि लोकाभिमुख झाले आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पांमुळे महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. येथील अनेक उत्कृष्ट प्रकल्प इतर महानगरपालिकांमध्येही सहजपणे लागू करता येतील.”

शहरी विकासाचा वेग साधताना नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत भोंडवे यांनी व्यक्त केले. भविष्यातील शहराचा विस्तार आणि पायाभूत सुविधा निर्माण करताना येणाऱ्या आव्हानांचा विचार करणेही गरजेचे आहे, असे ते म्हणाले. पिंपरी-चिंचवड शहराने उत्तम प्रकारे हरित पट्टे विकसित केले आहेत आणि वृक्षपुनर्रोपणाचा यशस्वी प्रयोग राबविला आहे. अशा मॉडेलचे अनुकरण देशातील इतर शहरांनीही करायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. पर्यावरणाला प्राधान्य देऊन विकास प्रकल्प राबवणे आवश्यक असून, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत जैवविविधता विभागासारखा स्वतंत्र विभाग असावा, असेही त्यांनी सुचवले. स्थानिक स्तरावरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आधुनिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा उपयोग करणे शक्य असून, देशभरात त्याचे यशस्वी प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे विविध प्रशासकीय यंत्रणांनी अवलंबलेल्या तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन भोंडवे यांनी केले.

आयुक्त शेखर सिंह यांनी ‘स्मार्ट सारथी’, ई-ऑफिस प्रणाली, दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली, एसएपी (SAP), भौगोलिक माहिती प्रणाली (GIS), जीआयएस लेअर, डिजिटल एलिव्हेशन मॉडेल, सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन (सीएचडीसी), हरित सेतू मास्टर प्लॅन, पंतप्रधान गती शक्ती अभियान, तक्रार निवारण प्रणाली, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, मिळकतकर प्रणाली, जीआय बेस रोड एसेट मॅनेजमेंट सिस्टिम, टीडीआर धोरण, शहरातील मालमत्तांचा ड्रोन सर्व्हे, एआय आधारित अनधिकृत होर्डिंगचा शोध, ई-रुपी प्रकल्प, दिव्यांग भवन आणि कौशल्यम प्रकल्प यांसारख्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती शिष्टमंडळाला दिली. या प्रकल्पांमुळे महानगरपालिका आणि शहरातील नागरिकांना कसा फायदा झाला, याची आकडेवारीसह माहिती त्यांनी सादर केली.

शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या दिव्यांगांसाठीच्या सुविधायुक्त ‘दिव्यांग भवन’ला विशेष भेट दिली आणि तेथील सोयी-सुविधांची पाहणी केली.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!