‘बिग व्हीआयपी प्रवास’: पुणे, पिंपरी-चिंचवड प्रशासनाचे सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन!
पर्यावरणपूरक भविष्यासाठी पीएमपीएमएल, बिग एफएम आणि रोटरी क्लबचा अनोखा उपक्रम; आयुक्तांनी दिला महत्त्वाचा संदेश!
पुणे, १४ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल), ९५ बिग एफएम आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बिग व्हीआयपी प्रवास’ या विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, दिनांक १४ जून २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता स्वारगेट येथील पीएमपीएमएलच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
पर्यावरणपूरक प्रवासाचा संदेश, मान्यवरांकडून प्रतिकात्मक बस प्रवास!
स्वच्छ आणि हरित भविष्यासाठी नागरिकांमध्ये सार्वजनिक वाहतुकीबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या उपक्रमात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. नवल किशोर राम (भाप्रसे), पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे (भाप्रसे), पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. शेखर सिंह (भाप्रसे), पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापकीय संचालक मा. श्री. नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती आशा राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यासोबतच रोटरी क्लव ऑफ पिंपरीचे अध्यक्ष रोटेरियन संतोष गिरंजे, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट रोटेरियन संतोष मराठे, तसेच इतर पदाधिकारी आणि ९५ बिग एफएमच्या क्लस्टर प्रोग्रॅमिंग हेड श्रीमती गायत्री महादेवकर यांचीही उपस्थिती होती. शहरातील मान्यवर प्रशासकीय अधिकारी आणि इतर मान्यवरांनी स्वारगेट ते डेक्कन असा प्रतिकात्मक बस प्रवास करत खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
‘पीएमपीएमएल’च्या भविष्यातील योजना आणि सक्षमीकरण
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन ९५ बिग एफएमचे आरजे संग्राम यांनी केले. त्यांनी स्वारगेट ते डेक्कन बस प्रवासादरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी मान्यवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करत सकारात्मक संदेश दिला:
-
मा. श्री. नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महानगरपालिका: पुणे शहरातील वाहतूक घनतेची गंभीर परिस्थिती लक्षात घेता (प्रति किमी ३०० हून अधिक वाहने), सार्वजनिक वाहतूक ही काळाची गरज बनली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमपीएमएल एकत्रितपणे ही वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहेत. पीएमपीएमएलच्या ताफ्यात सीएनजी बस वाढवणे आणि स्मार्ट बसस्टॉप उभारणे हे प्राथमिक उद्दिष्ट राहील. परदेशात सार्वजनिक वाहतूक ही प्राथमिकता असते, तीच संस्कृती भारतातही रुजवणे आवश्यक आहे.
-
मा. श्री. शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका: निगडी ते दापोडी बीआरटी मार्गिकेवर दर तासाला सुमारे ५,६०० प्रवासी पीएमपीएमएल बसने प्रवास करतात. बीआरटी मार्गिका ही सार्वजनिक वाहतुकीसाठी जलद, सुरक्षित आणि प्रभावी साधन आहे, त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात बीआरटीचा विस्तार करण्यावर भर दिला जाईल.
-
मा. श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल: सुधारित स्टेज रचना व तिकीट दर लागू केल्यानंतर पीएमपीएमएलचे दैनंदिन उत्पन्न २ कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. ‘आपली पीएमपीएमएल’ मोबाईल ॲपमुळे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंग व बसचे लाईव्ह ट्रॅकिंग उपलब्ध झाले आहे, ज्यामुळे प्रवास अधिक सुलभ झाला आहे. पुणेकरांनी पर्यावरणपूरक आणि कोंडीमुक्त प्रवासासाठी पीएमपीएमएलला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. लवकरच ताफ्यातील बसेसची संख्या वाढवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धनाचा विश्वास: सामूहिक प्रयत्नांनीच यश!
या उपक्रमाद्वारे सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची गरज नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आली. अशा सामूहिक उपक्रमांद्वारे भविष्यातही पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलली जातील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. पीएमपीएमएलचा सक्रिय आणि मोलाचा सहभाग यामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीच्या संकल्पनेचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजात पोहोचला आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.