जिजामाता रुग्णालयातील १८ लाखांच्या गैरव्यवहारावर कारवाई करा; महिला काँग्रेसचा आयुक्तांना इशारा
भ्रष्टाचाराला मुकसंमती असल्याचा आरोप; आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
पिंपरी, दि. २ ऑगस्ट २०२५: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील सुमारे १८ लाख ६६ हजार रुपयांच्या गैरव्यवहारावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या भ्रष्टाचारात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर सामील असल्याचा आरोप करत, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांनी थेट आयुक्त शेखर सिंह यांना इशारा दिला आहे. पुढील आठ दिवसांत दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ न केल्यास महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
महापालिकेच्या विशेष लेखापरीक्षण अहवालात हा गैरव्यवहार उघड झाला आहे. महाराष्ट्र कोषागार नियमांनुसार, गोळा झालेली रक्कम दोन दिवसांच्या आत बँकेत जमा करणे बंधनकारक असताना, जिजामाता रुग्णालयात १८ लाख ६६ हजार रुपये १० दिवस ते एक महिन्यापर्यंत उशिरा जमा करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याशिवाय, साठा रजिस्टरमध्ये पावती पुस्तकांची नोंदही ठेवण्यात आली नव्हती. लिपिक आकाश गोसावी यांनी या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता साळवी, डॉ. वैशाली बांगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. जतिन होतवानी आणि डॉ. विकल्प भोई यांचा सहभाग असल्याचा आरोप सायली नढे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट २०२४ मध्ये आकाश गोसावी यांनी पुन्हा १ लाख ६२ हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याचाही आरोप नढे यांनी केला असून, यामध्येही वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आयुक्त शेखर सिंह यांच्यावर गंभीर आरोप
सायली नढे यांनी आयुक्तांवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, “हा शासकीय रकमेच्या चोरीचा थेट फौजदारी गुन्हा आहे. मात्र, आयुक्त शेखर सिंह यांनी या प्रकरणाला एकप्रकारे मुकसंमती दिली असून, केवळ लिपिक आकाश गोसावी यांच्यावर किरकोळ कारवाई केली आहे. ही कारवाई भ्रष्टाचाऱ्याला पाठीशी घालणारी आहे.”
या प्रकरणासंदर्भात १ जुलै २०२४ पासून वेळोवेळी निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळेच नढे यांनी आता थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
यावेळी स्वाती शिंदे, प्रियांका सगट, प्रज्ञा जगताप, आशा भोसले, प्रिया कोळेकर, आबा खराडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पुढील काळात या प्रकरणावर काय कारवाई होते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
