पिंपरीकरांच्या सेवेसाठी तालेरा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सज्ज!
२५० बेड क्षमतेसह आयसीयू, एनआयसीयू आणि डायलिसिस सेंटरही कार्यरत; दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट
२७ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांना सक्षम आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील तालेरा रुग्णालय आता २५० बेड क्षमतेसह पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले असून, येथे सर्व अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत.
एकाच ठिकाणी सर्व सोयीसुविधा
तालेरा रुग्णालयात स्त्रीरोग विभाग, बालरोग विभाग, मेडिकल विभाग, डायलिसिस सेंटर, अतिदक्षता विभाग (ICU) आणि नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) या सर्व सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. यामुळे महिलांना वेळेवर तपासणी आणि उपचार मिळतील, तर लहान मुलांच्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून दर्जेदार उपचार शक्य होईल.
रुग्णांसाठी विशेषतः जीवनदायी ठरणारी डायलिसिस सेंटरची सोय येथे सुरू झाली आहे. यापूर्वी खासगी रुग्णालयांवर अवलंबून असलेल्या मूत्रपिंडाच्या रुग्णांना आता अत्यंत माफक दरात व सुरक्षित वातावरणात ही सुविधा मिळणार आहे. गंभीर रुग्णांसाठी आयसीयू आणि नवजात बालकांसाठी एनआयसीयूची सुविधाही उपलब्ध झाल्याने तातडीच्या उपचारांसाठी रुग्णांना इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही.

नागरिकांच्या आरोग्यसुरक्षेसाठी कटिबद्ध
या महत्त्वपूर्ण उपक्रमाबद्दल बोलताना महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “नागरिकांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. तालेरा रुग्णालय हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण असून, हे केवळ वैद्यकीय सोयींचा विस्तार नाही, तर नागरिकांच्या आरोग्यसुरक्षेच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे.”
यासोबतच, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी तालेरा रुग्णालय हे आता केवळ उपरुग्णालय न राहता, शहरातील नागरिकांसाठी विश्वासाचे ठिकाण ठरत आहे. प्रत्येक नागरिकाला योग्य व दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आगामी काळात देखील महापालिका अशा दर्जेदार व चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहील.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी, तालेरा रुग्णालयात आयसीयू, एनआयसीयू व डायलिसिस या तीनही सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार दिले जातील, असे आश्वासन दिले.
तालेरा रुग्णालयाच्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यामुळे, पिंपरी-चिंचवड महापालिकेने आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि परवडणारी बनवण्याची आपली कटिबद्धता सिद्ध केली आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
