पिंपरी-चिंचवडच्या विद्यार्थ्यांची कलात्मक भरारी! मुंबईतील ‘MuSo’ प्रदर्शनासाठी दोन चित्रांची निवड
“क्रिएटिव्ह क्वोशंट आर्ट कॉम्पिटिशन” मध्ये दिव्या उपर्वट आणि वेदांत चौघुले यांचे यश; ‘पर्यावरण’ आणि ‘माझे स्वप्न’ विषयावर प्रभावी कलाकृती
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ४ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) शाळेतील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली कलात्मक प्रतिभा राज्य पातळीवर सिद्ध केली आहे. मुंबई येथील प्रतिष्ठित म्युझियम ऑफ सोल्युशन्स (MuSo) संस्थेतर्फे आयोजित “क्रिएटिव्ह क्वोशंट आर्ट कॉम्पिटिशन” या राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेतील पहिल्या ५५ उत्कृष्ट चित्रांमध्ये महापालिकेच्या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील ५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी “सर्जनशीलता, कल्पकता आणि सामाजिक जाण” या तिन्ही घटकांवर आधारित आपल्या कलाकृतींद्वारे एक वेगळा ठसा उमटवला.

मुंबईतील नामांकित म्युझियम ऑफ सोल्युशन्स (MuSo) या संग्रहालयात प्रदर्शनासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांच्या चित्रांचे विषय:
| विद्यार्थ्याचे नाव | शाळेचे नाव | चित्राचा विषय | संदेश |
| दिव्या अविनाश उपर्वट | पी.सी.एम.सी. पब्लिक स्कूल, खिंवसरा पाटील कन्या, थेरगाव | “भविष्यातील पर्यावरण आणि त्यासाठीचे उपाय” | पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती |
| वेदांत चौघुले | छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम शाळा, कासरवाडी | “माझे स्वप्न” (मी एक वैज्ञानिक) | कल्पनाशक्ती आणि प्रेरणादायी दृष्टिकोन |
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना “माझे स्वप्न” आणि “एआय नाही करू शकत” हे दोन विषय देण्यात आले होते. या माध्यमातून मुलांच्या विचारविश्वाची खोली आणि नवोन्मेषी दृष्टिकोन स्पष्ट दिसून आला.

महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गौरवपूर्ण उद्गार काढले.
“विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर समाज, विज्ञान आणि भविष्य यांना रंगांच्या माध्यमातून व्यक्त केलं, हीच खरी शिक्षणाची ताकद आहे. या स्पर्धेने आपल्या शाळांतील विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि आत्मविश्वास अधिक बळकट झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादित न ठेवता त्यांच्या कल्पकतेला उंच भरारी देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे.”
यावेळी शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, कला विभागाचे नोडल अधिकारी श्रीकांत चौघुले, पी.सी.एम.सी. पब्लिक स्कूल, खिंवसरा पाटील कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली शिंदे, कला शिक्षक प्रीती अहिरे आणि छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम कासरवाडी शाळेचे मुख्याध्यापक पारीजात प्रकाश यांच्या अधिपत्याखाली विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
