पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीसाठी युद्धपातळीवर तयारी: आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे महत्त्वपूर्ण निर्देश
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. १७ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी, दि. १७ नोव्हेंबर २०२५ : आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीनिमित्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (१७ नोव्हेंबर २०२५) महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला आणि महत्त्वपूर्ण निर्देश दिले. नागरिकांमध्ये मतदानासाठी जनजागृती वाढवणे आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करणे, यावर त्यांनी विशेष भर दिला.
आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील बाबींवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या:
-
मतदान केंद्रांची स्थळनिश्चिती व सुविधा.
-
निवडणूक कक्ष अधिकाऱ्यांची नेमणुकी.
-
अपंगजनांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सोयी.
-
मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण.
-
ईव्हीएमची सुरक्षितता.
-
मतदार यादी अद्ययावत करणे.
-
प्रभागांतील आवश्यक पायाभूत दुरुस्ती.
-
प्रारूप मतदार यादीतील बदल.
-
मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवणे.
-
तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करणे.

निवडणूक तयारीसह आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेच्या दैनंदिन कामकाजाचाही आढावा घेतला. शहरातील दैनंदिन सेवा, स्वच्छता व्यवस्था, खड्डेमुक्ती मोहीम आणि मास्टर प्लॅन अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी मागवली. अवैध होर्डिंग हटविण्याची मोहीम, रस्ते प्रकाशयोजना, जलपुरवठा व ड्रेनेज यंत्रणेची स्थिती याबाबतही सविस्तर चर्चा करून अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सहायक आयुक्त मनोज लोणकर, नगरसचिव मुकेश कोळप, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहशहर अभियंता बापू गायकवाड, मनोज शेठीया, अनिल भालसाकळे, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयराज यादव, उपायुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप ठेंगल, सचिन पवार, सिताराम बहुरे, संदीप खोत, ममता शिंदे, उपआरोग्य वैद्यकीय अधिकारी अभयचंद्र दादेवार, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, किरणकुमार मोरे, अजिंक्य येळे, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, अमित पंडित, निवेदिता घार्गे, पूजा दूधनाळे, अश्विनी गायकवाड, मुख्य उद्यान अधिकारी महेश गारगोटे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या. सर्व विभागांनी समन्वय राखत प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेच्या मूलभूत सुविधा आणि सेवांवर अधिक भर देऊन कार्यक्षमता वाढवण्याचे आदेशही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.
यासोबतच, सर्व प्रभागांना विशेष मोहीम राबवून अवैध होर्डिंग तातडीने हटवण्याचे निर्देश देण्यात आले. सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या किंवा वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बोर्डांवर तत्काळ कारवाई करावी, तसेच परवानाधारक होर्डिंगची माहिती अद्ययावत ठेवून महसूल विभागाशी समन्वय वाढवावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
