PCMC निवडणुकीचा बिगुल! प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध, हरकतींसाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत
मतदारांची संख्या वाढल्याने प्रशासनाची कसरत; ‘मतदार यादी’ निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाची पायरी – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २१ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील मतदारांची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी नागरिकांना २० नोव्हेंबर २०२५ ते २७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत मुदत देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १७,१३,८९१ मतदार असून, यापैकी ९,०४,८१५ पुरुष आणि ८,०७,१३९ महिला मतदार आहेत. मतदारांच्या वाढत्या संख्येमुळे निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
नागरिकांच्या हरकती आणि सूचना स्वीकारण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिक अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच मुख्यालयातील सावित्रीबाई फुले सभागृह येथे हरकती व सूचना सादर करू शकतात.
पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी मतदारांना आवाहन केले आहे की, “प्रारूप मतदार यादी ही आगामी निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. शहरातील प्रत्येक मतदाराने स्वतःचे नाव यादीत नोंदले आहे का, याची खात्री करून आवश्यक असल्यास हरकती व सूचना वेळेत दाखल करणे अत्यावश्यक आहे. प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकती व सूचनांवर आयोगाच्या नियमांन्वये कार्यवाही करण्यात येईल.”
प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकती आणि सूचनांचा विचार करण्यासाठी निवडणूक विभागाने वेळापत्रक निश्चित केले आहे:
| क्र. | निवडणूक प्रक्रिया | निश्चित तारीख |
| १ | प्रारूप मतदार यादी हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करणे | २० नोव्हेंबर २०२५ |
| २ | प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करणे | २० नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२५ |
| ३ | प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतींवर निर्णय घेऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे | ५ डिसेंबर २०२५ |
| ४ | मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे | ८ डिसेंबर २०२५ |
| ५ | मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे | १२ डिसेंबर २०२५ |
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, ज्या मतदारांना प्रारूप मतदार यादीबद्दल हरकती व सूचना दाखल करायच्या असतील, त्यांनी नमुना ‘अ’ मध्ये आणि तकारदारांनी नमुना ‘ब’ मध्ये मुदतीत त्या दाखल कराव्यात. मुदत संपल्यानंतर आलेल्या हरकती/सूचनांचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती महापालिका निवडणूक विभागाने दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, सदर प्रारूप मतदार याद्या प्रति पृष्ठ रु. २/- याप्रमाणे सावित्रीबाई फुले सभागृह येथील निवडणूक विभागात विक्रीसाठी उपलब्ध आहेत, अशी माहितीही महापालिका निवडणूक विभागाने दिली आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
