पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून राडारोडा व्यवस्थापन आणि कामगार सुरक्षेबाबत जनजागृती
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम; उघड्यावर राडारोडा न टाकता टोल-फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे बांधकाम व्यावसायिकांना आवाहन
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. २ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक १६, किवळे येथील शुभारंभ क्लारा कन्स्ट्रक्शन साईटवर महत्त्वपूर्ण जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये बांधकाम राडारोडा व्यवस्थापन आणि कामगार सुरक्षा या दोन महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
यावेळी उपस्थित बांधकाम व्यावसायिकांना पिंपरी चिंचवड शहरात बांधकामातून निर्माण होणारा राडारोडा उघड्यावर न टाकता, तो महापालिकेच्या अधिकृत राडारोडा प्रकल्पात जमा करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
-
महापालिकेचे आवाहन: महापालिकेने राडारोडा संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांनी १८००१२०३३२१२६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून राडारोडा संकलनासाठी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

बांधकाम कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही यावेळी विशेष जनजागृती करण्यात आली. बांधकामस्थळी काम करताना मास्क, सेफ्टी जॅकेट, सेफ्टी शूज अशा सुरक्षासाधनांचा योग्य वापर करणे अनिवार्य असल्याचे विशेषत्वाने सांगण्यात आले.
या उपक्रमातून कामगारांना सुरक्षित कामकाजाचे नियम, अपघात टाळण्याच्या पद्धती आणि सुरक्षेची मूलभूत तत्त्वे समजावून सांगण्यात आली, जेणेकरून बांधकामस्थळी होणारे अपघात टाळता येतील.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

