पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या विजयानंतर ‘पॉवर गेम’ सुरू; शंकर जगतापांची सरशी, तर भोसरीत महेश लांडगेंना राहुल भोसलेंचे आव्हान
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १९ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवली असली, तरी आता खऱ्या अर्थाने पक्षांतर्गत ‘पॉवर गेम’ला सुरुवात झाली आहे. महापौर आणि शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आता शहरात रस्सीखेच सुरू झाली असून, कोणाचे वर्चस्व राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
या निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघातून तब्बल ३९ नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळवले आहे. दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप यांचा वारसा आणि शंकर जगताप यांचे संघटन कौशल्य यामुळे चिंचवडमध्ये भाजपला मोठे यश मिळाले. परिणामी, आगामी काळात महापालिकेत शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांचे वर्चस्व राहण्याची दाट शक्यता आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखले जाणारे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या मतदारसंघातून ३४ नगरसेवक निवडून आणण्यासाठी मोठी ताकद लावली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मातब्बर नेते राहुल भोसले यांनी नेहरूनगर प्रभागात भाजपच्या विजयरथाला रोखत मोठे यश मिळवले. राहुल भोसले यांच्या या कामगिरीमुळे महेश लांडगे यांच्या ‘पॅनल टू पॅनल’ विजयाच्या स्वप्नाला तडा गेला आहे. पालकमंत्री अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यातील राजकीय संघर्षात राहुल भोसले हे महेशदादांसाठी ‘टफ’ फायटर ठरल्याचे या निकालांवरून स्पष्ट होत आहे.
पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघात भाजपला म्हणावे तसे यश मिळाले नाही. विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे आणि आमदार उमाताई खापरे या दोन बड्या नेत्यांची ताकद असूनही, या भागात भाजपला केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे पिंपरी विधानसभेतील भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येचा विचार करता, ज्या आमदाराच्या गटाचे जास्त नगरसेवक, त्याचेच महापालिकेत अस्तित्व राहणार हे उघड आहे. या गणितात ३९ नगरसेवकांचे बळ पाठीशी असलेले शंकर जगताप यांचे पारडे सध्या जड दिसत आहे. चिंचवड विरुद्ध भोसरी अशा या सत्तासंघर्षात भाजपचे वरिष्ठ नेतृत्व कोणाची वर्णी लावणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपादकीय मत:
भाजपच्या या विजयामध्ये चिंचवडचा वाटा सिंहाचा आहे. मात्र, भोसरीमध्ये राहुल भोसले यांनी ज्या पद्धतीने भाजपला खिंडार पाडले, ते पाहता आगामी काळात महापालिकेत भाजपला विरोधी पक्षाकडून कडवे आव्हान मिळण्याची चिन्हे आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
