गोरगरीब रुग्णांना मदतीचा आधार द्या! पिंपरीत ‘महापौर निधी’ पुन्हा सुरू करण्याची मागणी; सनराईज मेडीकल फाउंडेशनचे आयुक्तांना निवेदन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १२ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी वरदान ठरणारा ‘महापौर निधी’ तातडीने पुन्हा सुरू करण्यात यावा, अशी मागणी सनराईज मेडीकल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात फाउंडेशनने महापालिका महापौर रवी लांडगे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लेखी निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
महापौर निधीच्या माध्यमातून पूर्वी हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण (Kidney Transplant), डायलिसिस, कर्करोग यांसारख्या गंभीर आणि महागड्या उपचारांसाठी गरजू रुग्णांना थेट आर्थिक मदत दिली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा निधी पूर्णतः बंद आहे. परिणामी, आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले असून, अनेकांचे प्राण धोक्यात आले आहेत.
निधी बंद असल्यामुळे अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मदतीसाठी सामाजिक संस्थांकडे धाव घेत आहेत. प्रशासकीय स्तरावर या निधीचे लेखापरीक्षण (Audit) प्रलंबित असल्याने हा निधी रखडला असल्याची चर्चा आहे. हे लेखापरीक्षण तात्काळ पूर्ण करून मानवतेच्या दृष्टिकोनातून हा निधी पुन्हा कार्यान्वित करावा, जेणेकरून गोरगरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळून त्यांना दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शहरातील वाढती लोकसंख्या आणि आरोग्याचा वाढता खर्च पाहता, महापालिकेचा हा निधी सर्वसामान्यांसाठी मोठा आधार ठरू शकतो. नवनिर्वाचित महापौर आणि आयुक्तांनी या संवेदनशील विषयावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
