‘शिवगर्जना’ युवकांना सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारे! मनोज जरांगे पाटील यांनी अनुभवला शिवचरित्राचा थरार; निगडीत फटाक्यांच्या आतषबाजीने उजळले आकाश
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २० फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : “छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे करताना न्याय, समता आणि कष्टकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवले होते. ‘शिवगर्जना’ महानाट्यातून हाच इतिहास आजच्या तरुणांसमोर प्रभावीपणे येत आहे. युवकांमध्ये राष्ट्राभिमान जागवण्याबरोबरच समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव निर्माण करण्याची ताकद या सादरीकरणात आहे,” असे प्रतिपादन थोर सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘विचार प्रबोधन पर्वा’अंतर्गत ‘शिवगर्जना’ महानाट्याचा दुसरा प्रयोग निगडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित राहून संपूर्ण महानाट्याचा आनंद घेतला.
भव्य नेपथ्य, पारंपारिक वेशभूषा आणि अडीचशे कलाकारांच्या जिवंत अभिनयाने शिवकालीन प्रशासन, स्वराज्याचा संघर्ष आणि आरमाराची उभारणी यांसारखे पैलू प्रेक्षकांसमोर उलगडले. आधुनिक तांत्रिक साधनांच्या वापरामुळे उपस्थित शिवप्रेमी मंत्रमुग्ध झाले होते. अनेक ऐतिहासिक प्रसंगांना प्रेक्षकांनी उभे राहून आणि टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
सोहळ्यातील उपस्थित मान्यवर:
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेवक अमित गावडे, मारुती भापकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपआयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जाधव, वैभव जाधव, संतोष सातपुते, जीवन बोराडे, सागर तापकीर आणि इतर मान्यवरांसह हजारो नागरिक उपस्थित होते.
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने रात्री भव्य फटाक्यांच्या आतषबाजीचे आयोजन करण्यात आले होते. विविध रंगांची उधळण आणि आकर्षक आकाशदीपांमुळे संपूर्ण निगडी परिसर उजळून निघाला होता. या नेत्रदीपक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे परिसरात उत्सवाचे चैतन्य पसरले होते.
महापालिकेच्या वतीने कार्यक्रमस्थळी पिण्याचे पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृहे, वाहतूक नियोजन आणि कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. यामुळे नागरिकांना कोणत्याही त्रासाशिवाय या ऐतिहासिक सोहळ्याचा अनुभव घेता आला. आज १९ फेब्रुवारी रोजी या महानाट्याचा तिसरा आणि शेवटचा प्रयोग संपन्न होणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


