नवी सांगवी, पिंपळे गुरवमध्ये अनधिकृत बांधकामांचा महापूर! भाजपच्या बड्या नेत्यांचा वरदहस्त; माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचा कारवाईचा इशारा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २० फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नवी सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरात अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. महापालिकेचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेली ही बेकायदेशीर बांधकामे तात्काळ भुईसपाट करावीत, अशी आग्रही मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन देऊन प्रशासकीय दिरंगाईवर ताशेरे ओढले आहेत.
पिंपळे गुरवच्या विविध भागांत कोणतीही परवानगी न घेता इमारतींचे मजल्यावर मजले चढवणे, निवासी इमारतींचे व्यावसायिक वापरासाठी रूपांतर करणे आणि बेकायदेशीर गाळे उभारण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. “मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होणे शक्य नाही,” असा थेट आरोप जगताप यांनी केला आहे. विशेषतः निवडणूक काळाचा फायदा घेत या बेकायदा कामांना अधिक वेग आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राजेंद्र जगताप यांनी निवेदनात खळबळजनक आरोप केला आहे की, नवी सांगवी ‘ह’ प्रभाग अंतर्गत प्रभाग क्रमांक ३१ मध्ये चक्क एका लोकप्रतिनिधीकडूनच सहा मजली अनधिकृत बांधकाम उभारण्यात आले आहे. तसेच ‘ड’ प्रभाग अंतर्गत प्रभाग २९ मध्येही मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. “तीन मजल्यांपर्यंत बांधकाम केले असल्यास वरच्या सदनिका आम्हाला द्या, अन्यथा कारवाई करू,” असा दम काही घटकांकडून दिला जात असल्याचे धक्कादायक वास्तवही त्यांनी समोर आणले आहे.
राजेंद्र जगताप म्हणाले की, “आमचा सामान्य नागरिकांच्या निवासाच्या बांधकामांना विरोध नाही; मात्र व्यावसायिक स्वरूपाची अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवावीत. या बांधकामांना भाजपच्या बड्या नेत्यांचा वरदहस्त आहे. सामान्य नागरिकांना त्यांच्या जागा विकण्यास भाग पाडले जाते आणि भागीदारीच्या नावाखाली मोठ्या सदनिका उभारल्या जात आहेत.”
महापालिका प्रशासनाने या सर्व बांधकामांचा तातडीने सर्व्हे करून जमीनदोस्त कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे दाद मागितली जाईल आणि प्रसंगी न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा राजेंद्र जगताप यांनी दिला आहे. यामुळे आता महापालिका प्रशासन अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
