कागदावर नसबंदी, रस्त्यावर कुत्र्यांचा सुळसुळाट! भाजप नगरसेवक राजू मिसाळ यांनी केली ७ ते ८ कोटींच्या भ्रष्टाचाराची पोलखोल; महापालिकेत कुत्र्याची छबी दाखवत प्रशासनाला घेरले
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २० फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीत झालेल्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढण्याचे सत्र सुरूच असून, आता सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकाने प्रशासनाला घरचा आहेर दिला आहे. प्रभाग क्र. १५ चे नगरसेवक राजू मिसाळ यांनी महापौर आणि आयुक्तांच्या समोर चक्क ‘कुत्र्याची प्रतिकात्मक छबी’ (फोटो) दाखवत भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये सुमारे ७ ते ८ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
राजू मिसाळ यांनी महापौर दालनात केलेल्या या अनोख्या आंदोलनाने महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासकीय काळात लोकप्रतिनिधी नसल्याचा फायदा घेत अधिकाऱ्यांनी ठेकेदारांशी संगनमत करून नसबंदीचे आकडे फुगवून दाखवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
-
कागदोपत्री खेळ: जर कागदावर हजारो कुत्र्यांची नसबंदी पूर्ण झाली आहे, तर रस्त्यांवरील कुत्र्यांची संख्या कमी का झाली नाही?
-
अहवालातील तफावत: नसबंदीवर ७-८ कोटी रुपये खर्च झाले असताना कुत्रे चावण्याच्या घटना आणि नागरिकांच्या तक्रारी का वाढत आहेत?
-
पारदर्शकतेचा अभाव: नसबंदीचे वैद्यकीय प्रमाणपत्र, मायक्रोचिपिंगची माहिती आणि परिसरनिहाय आकडेवारी सार्वजनिक का केली जात नाही?
प्रशासक राजवटीत निर्णय प्रक्रिया पूर्णपणे अधिकाऱ्यांच्या हाती होती. पारदर्शकतेचा अभाव आणि ठेकेदारांची मनमानी यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजू मिसाळ यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “कागदावर नसबंदी आणि रस्त्यावर वाढती संख्या हा विरोधाभास आता उघड करण्याची वेळ आली आहे,” असा सज्जड दम त्यांनी यावेळी दिला.
आज प्रश्न एका प्रतीकात्मक छबीचा नसून, करदात्या नागरिकांच्या पैशांच्या हिशोबाचा आणि सुरक्षिततेचा आहे. प्रशासकीय काळातील या ‘कुत्रा नसबंदी’ प्रकरणाचा संपूर्ण लेखाजोखा सार्वजनिक झाला नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही मिसाळ यांनी दिला आहे. आता या पोलखोलनंतर महापौर आणि आयुक्त चौकशीचे काय आदेश देतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
