मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरील चेन स्नॅचिंगचा १५ दिवसांत छडा! अल्पवयीनासह तिघांना बेड्या; सीसीटीव्ही फुटेज ठरले तपासात कळीचे
अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, २० फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
मूर्तिजापूर : येथील रेल्वे स्थानकावर ४ फेब्रुवारी रोजी प्रवाशांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या चेन स्नॅचिंग प्रकरणाचा लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या १५ दिवसांत छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तिघांना जेरबंद केले असून चोरीला गेलेले दागिने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
यवतमाळ येथील पूजा भूषण मेश्राम (वय ४०) या अकोला येथील लग्नसमारंभ आटोपून ४ फेब्रुवारी रोजी पतीसह काचीगुडा–नरखेड एक्सप्रेसने बडनेराकडे जात होत्या. दुपारी गाडी मूर्तिजापूर स्थानकावरून सुटत असताना, खिडकीजवळ बसलेल्या मेश्राम यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन (किंमत अंदाजे ६७,५०० रुपये) अज्ञात चोरट्याने अत्यंत चलाखीने ओढली आणि पळ काढला. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
-
सीसीटीव्हीचा वापर: रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयितांची हालचाल टिपली गेली.
-
आरोपींची ओळख: फुटेजच्या आधारे हिरपूर येथील आदित्या अजाबराव तायडे (वय १८) याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
-
साखळी उघड: तपासात असे समोर आले की, चोरीनंतर आदित्यने अंबा नगर येथील रुपेश रमेश श्रीवास याच्या मदतीने ही चेन ‘वैष्णवी ज्वेलर्स’च्या संचालकाकडे गहाण ठेवली होती. या संपूर्ण कटात एक अल्पवयीन मुलगाही सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही धडक कारवाई लोहमार्ग पोलीस (जीआरपी, अकोला) आणि मूर्तिजापूर पथकाने संयुक्तरीत्या केली. रेल्वे पोलीस उपनिरीक्षक वडतकर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. या कारवाईमुळे रेल्वे स्थानक परिसरात वावरणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसणार असून प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासादरम्यान खिडकीजवळ बसताना दागिने आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ रेल्वे हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
