अकोला पोलिसांची मोठी कारवाई! दोन महिन्यांपासून फरार असलेला लैंगिक अत्याचारातील आरोपी जेरबंद; रेल्वे स्टेशन परिसरातून आवळल्या मुसक्या
अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, २७ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या गंभीर लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गोपाल रामकृष्ण दांदळे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या आरोपीला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
३१ डिसेंबर २०२५ रोजी अकोला सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गोपाल रामकृष्ण दांदळे (रा. बसेरा कॉलनी, मलकापूर, अकोला) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७५(१), ७९, २९६, ३५१(२) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता.
आरोपी गोपाल दांदळे हा अटकेच्या भीतीने सतत आपले राहण्याचे ठिकाण बदलत होता. त्याने स्वतःचा मोबाईल फोनही बंद करून ठेवला होता, त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा माग काढला. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपी शिवणी शिवापूर रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचला. रेल्वे स्टेशनच्या बाहेर येत असतानाच गोपाल दांदळे याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी सिटी कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पो.उप.नि. गोपाल जाधव, विष्णू बोडखे, पोलीस अंमलदार वसीमोद्दीन, किशोर सोनोने, महेंद्र मलिये, रवींद्र खंडारे, खुशाल नेमाडे, स्वप्नील खेडकर, श्रीकांत पातोंड आणि सतीश पवार यांच्या पथकाने केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
