पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठी आनंदाची बातमी! मालमत्ता कराच्या दंडावर तब्बल ९० टक्के सवलत; महापालिकेची ‘अभय योजना’ १ मार्चपासून सुरू
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २७ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी महानगरपालिकेने मोठा दिलासा दिला आहे. थकीत कराची वसुली प्रभावीपणे करण्यासाठी आणि नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी आगामी १ मार्च २०२६ पासून विशेष ‘अभय योजना’ लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या योजनेअंतर्गत मालमत्ता करावरील विलंब दंडावर तब्बल ९० टक्के सवलत दिली जाणार आहे.
शहराच्या विकासात मालमत्ता कराचा वाटा महत्त्वाचा असतो. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या सुविधा नागरिकांच्या करातूनच उभ्या राहतात. त्यामुळे थकबाकीदारांनी या संधीचा लाभ घेऊन शहराच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
-
कोणाला लाभ मिळणार? : निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ताधारकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
-
सवलतीची अट : आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील थकबाकीसह संपूर्ण रक्कम एकरकमी भरल्यासच ९० टक्के दंड सवलत लागू होईल.
-
कालावधी : ही योजना १ मार्च ते ३१ मार्च २०२६ या मर्यादित कालावधीसाठीच लागू राहणार आहे.
आतापर्यंत शहरातील ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी प्रामाणिकपणे कराचा भरणा केला असून, महापालिकेच्या तिजोरीत ७४७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मात्र, अद्यापही सुमारे २ लाख १२ हजार ४४० मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केलेला नाही. या थकबाकीदारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने ‘अभय योजना’ आणली आहे.
कर वसुलीला गती देण्यासाठी महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके थकबाकीदारांशी थेट संपर्क साधत असून, जप्तीसारखी कठोर कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी ३१ मार्चपूर्वी आपल्या थकबाकीचा निपटारा करावा, अशा सूचना दिल्या जात आहेत.
मालमत्ता कराची मोठी रक्कम थकलेल्या नागरिकांसाठी ही शेवटची आणि सुवर्णसंधी मानली जात आहे. १ मार्चपासून सुरू होणाऱ्या या योजनेमुळे महापालिकेच्या महसुलात मोठी भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
