‘आर्टी’च्या दिनदर्शिकेत महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीचा विसर! जनसंपर्क अधिकारी स्वप्निल भालेराव यांच्या निलंबनाची मागणी; पिंपरीत तीव्र निषेध
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, ०८ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेत गंभीर चुका झाल्याचे समोर आले आहे. या दिनदर्शिकेत डॉ. अण्णा भाऊ साठे आणि आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंती व पुण्यतिथीचा उल्लेख टाळल्याबद्दल जनसंपर्क अधिकारी स्वप्निल भालेराव यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी सकल मातंग समाज आणि शिवशाही व्यापारी संघाने केली आहे.
‘आर्टी’ ही संस्था महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. मात्र, २०२६ च्या अधिकृत दिनदर्शिकेत:
-
डॉ. अण्णा भाऊ साठे यांची १ ऑगस्टची जयंती आणि १८ जुलैची पुण्यतिथी,
-
तसेच आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांची जयंती आणि पुण्यतिथी,
या अत्यंत महत्त्वाच्या दिवसांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. हा प्रकार महापुरुषांचा अवमान करणारा असून समाजामध्ये यामुळे तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेत जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. “ज्या संस्थेचे नावच अण्णा भाऊ साठे यांच्या नावावर आहे, त्या संस्थेच्या दिनदर्शिकेत महापुरुषांच्या तारखा विसरणे ही अक्षम्य चूक आहे. भालेराव यांच्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी झालेल्या निषेध सभेत ज्येष्ठ नेते संदिपान झोंबाडे, प्रबोधन पर्वचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ, बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष संजय धुतडमल, मंगेश डाखोरे, गणेश कलवले, उद्योजक अनिल गायकवाड, डी.पी. खंडाळे, सतिष भवाळ, शाहीर आसाराम कसबे, अनिल तांबे, भगवान शिंदे, आण्णा कसबे, नानासाहेब कांबळे, गणेश अवघडे, मारूती सोनटक्के, मोहन भिसे, दत्ता थोरात, संतोष रनशिंगे, सुभाष लांडगे आणि आबासाहेब मांढरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रशासकीय निष्काळजीपणामुळे महापुरुषांच्या ऐतिहासिक तारखांकडे दुर्लक्ष होणे, हे दुर्दैवी असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


