कर्नाटकच्या सीमावर्ती भागांत घुमला मराठीचा जयघोष! भालकी तालुक्यातील शाळांना ‘मराठी भाषा गौरव’ पुरस्कार; ग्रंथराज ज्ञानेश्वरी व संविधानाचे वाटप
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, १२ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
भालकी (जि. बिदर) : “अभिमान मराठीचा, उत्सव मराठी भाषेचा…!” या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील मराठी शाळांना बळ देण्यासाठी पुण्याच्या मराठवाडा जनविकास संघ आणि भालकीच्या शारदा प्रतिष्ठान यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला. भालकी तालुक्यातील अट्टरगा, गुंजरगा, माणकेश्वर आणि बसवनवाडी या गावांतील मराठी शाळांमध्ये मराठी संस्कृती आणि ज्ञानाची पालखी मोठ्या उत्साहात अवतरली.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात सीमेवर मराठी टिकवून ठेवणाऱ्या शाळा आणि शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
केवळ सत्कार करून न थांबता, सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्याचा वारसा जपला जावा, यासाठी या शाळांना पुढील साहित्याचे वाटप करण्यात आले:
-
भारताचे संविधान: लोकशाही मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी.
-
ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज गाथा: अध्यात्म आणि मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी.
-
शैक्षणिक साहित्य: गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी वह्या व इतर साहित्याचे वाटप.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक आणि मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. अरुण श्रीपती पवार यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. “मराठी आपली मायबोली आहे. ती सातासमुद्रापार नेण्यासोबतच आपल्या शेजारील राज्यांच्या सीमावर्ती भागात ती टिकवून ठेवणे, हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. शारदा प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. दिनकर मोरे यांनीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
या ऐतिहासिक उपक्रमात ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज, सूर्यकांत कुरुलकर, दत्तात्रय धोंडगे, प्रा. रविंद्र खांडेकर, सुधाकर थिटे, किशोर अट्टर्गेकर, तुकाराम नारायणराव मोरे, हरिदेव रुद्रमणी, तुकाराम शेडोळे, अमृत अक्रे आणि सीमेवरील अनेक मराठी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


