पिंपरी-चिंचवड स्थायी समिती सभेत विकासकामांचा धडाका; आरोग्य, पायाभूत सुविधा आणि झोपडपट्टी विकासाच्या प्रस्तावांना मंजुरी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, ९ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली:
पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहराच्या विकासाला गती देणारे विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे होते. या सभेत आरोग्य, शिक्षण, रस्ते दुरुस्ती आणि झोपडपट्टी भागातील मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
या बैठकीला स्थायी समिती सदस्य शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता आसवानी, शीतल वर्णेकर, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने, सुलभा उबाळे तसेच अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
-
रावेत-किवळे भाग: रावेत, किवळे, मामुर्डी आणि विकासनगर परिसरात रस्ते दुरुस्ती व स्मशानभूमी देखभाल कामांना मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, रावेत येथील इंद्रप्रभा सोसायटी रस्त्यावरील अडथळा ठरणारे महापारेषणचे १३२ केव्ही क्षमतेचे दोन वीज मनोरे हलविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
-
पिंपळे गुरव व मोशी: मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसरात स्थापत्य कामे आणि पिंपळे गुरव येथे रोड फर्निचर दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.
-
सेक्टर २३: येथील जलशुद्धीकरण केंद्रातील केमिकल टाक्यांना सुरक्षा आवरण उभारण्याचे काम हाती घेतले जाईल.
-
झोपडपट्टी सुधारणा: ग, ड, ब, फ आणि ई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आदर्शनगर, सिद्धार्थनगर, वेताळनगर, काळाखडक यांसह विविध ३० हून अधिक झोपडपट्टी परिसरात गटार आणि स्टॉर्म वॉटर लाईन टाकण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली.
-
आरोग्य विभाग: थेरगाव, भोसरी, जिजामाता आणि तालेरा रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली असून, मासुळकर नेत्र रुग्णालयासाठी नवीन उपकरणे खरेदी केली जाणार आहेत.
-
स्वच्छता: ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सार्वजनिक शौचालयांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई आणि देखभालीस मान्यता देण्यात आली.
-
शिक्षण व स्मृती दिन: महापालिका शाळांची देखभाल आणि फर्निचर कामांना मंजुरी. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले जयंतीनिमित्त तात्पुरती ध्वनी व प्रकाश व्यवस्था करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
-
स्मार्ट सिटी: स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ERP प्रणालीसाठी व्हर्च्युअल मशिन उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.
“शहराचा सर्वसमावेशक विकास करण्याच्या दृष्टीने आज अनेक प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. रस्ते, स्वच्छता आणि आरोग्य सेवा यावर आमचा विशेष भर असून, झोपडपट्टी भागातील नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मंजूर झालेली कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.”
— अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


