वाकड, ताथवडे अन् पुनावळेकरांना दिलासा मिळणार; खराडी आयटी पार्क आणि स्वारगेटसाठी थेट PMPML बस सुरू करण्याची नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांची आग्रही मागणी!
पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आहाड यांना दिले निवेदन; वेळ, पैसा वाचण्यासह वाहतूक कोंडी सुटण्यास होणार मदत
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २८ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
वाकड: पिंपरी-चिंचवड शहरातील वेगाने विकसित होणाऱ्या वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटी कंपन्यांचे कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांना सध्या पुण्याचे मुख्य केंद्र असलेल्या स्वारगेट आणि खाराडी आयटी पार्क येथे जाण्यासाठी थेट ‘पीएमपीएमएल’ (PMPML) बससेवा उपलब्ध नसल्याने दररोज प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांची ही मोठी गैरसोय दूर करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक कुणालभाऊ वाव्हळकर यांनी थेट पीएमपीएल प्रशासनाकडे धाव घेत दोन नवीन आणि थेट बसमार्ग तातडीने सुरू करण्याची जाहीर मागणी केली आहे. या संदर्भातील सविस्तर मागण्यांचे अधिकृत निवेदन नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (CMD) मा. महेशजी आहाड साहेब यांना प्रत्यक्ष भेटून दिले आहे. या मागणीवर प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करावी, अशी आग्रही विनंती त्यांनी केली आहे. प्रभाग २५ चे नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वाकड, पुनावळे आणि ताथवडे हा परिसर पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क आणि मुंबई-बेंगलोर हायवेला लागून असल्याने येथे लोकसंख्या कमालीची वाढली आहे. या परिसरातून दररोज हजारो नागरिक, महिला आणि तरुण नोकरीनिमित्त खाराडी येथील ‘इऑन आयटी पार्क’ (EON IT Park) तसेच मध्यवर्ती पुण्यात म्हणजेच स्वारगेट येथे जात असतात.
परंतु, या दोन्ही प्रमुख ठिकाणी जाण्यासाठी सध्या कोणतीही थेट बस उपलब्ध नाही. परिणामी, प्रवाशांना अनेक बसेस बदलून, प्रचंड मनस्ताप सहन करत प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांचा अमूल्य वेळ वाया जातो, आर्थिक खर्च वाढतो आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या नवीन बसमार्गांचे महत्त्व सांगताना नगरसेवक कुणालभाऊ वाव्हळकर म्हणाले, “देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच देशवासीयांना इंधन बचतीचे आणि पर्यावरण संवर्धनाचे आवाहन केले आहे. वाढती प्रदुषणाची पातळी आणि रस्त्यांवरील जीवघेणी वाहतूक कोंडी कमी करायची असेल, तर नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर कमी करून जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा (Public Transport) वापर करणे ही काळाची गरज बनली आहे.
परंतु, यासाठी प्रशासनाने आधी नागरिकांना सक्षम आणि थेट पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. वाकड, ताथवडे व पुनावळे येथील रहिवाशांना जर ही थेट PMPML बससेवा मिळाली, तर आयटी कर्मचारी, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळेल. यामुळे लोकांचे खाजगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन इंधन बचत होईल, पर्यावरणाचे रक्षण होईल आणि हायवेसह शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे.”शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पीएमपीएमएल प्रशासनाने पारंपरिक चौकटीबाहेर पडून या नवीन मार्गांचे सर्वेक्षण करावे आणि अत्यंत सकारात्मक विचार करून लवकरात लवकर ही नवीन थेट बससेवा प्रत्यक्षात रस्त्यावर आणावी, अशी आग्रही मागणी नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला वाकड आणि पुनावळे परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या फेडरेशनने आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोठे समर्थन दिले असून, आता महेश आहाड यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
