news
Home पिंपरी चिंचवड नंबर प्लेट कंत्राटातील सावळा गोंधळ उघड

नंबर प्लेट कंत्राटातील सावळा गोंधळ उघड

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा रोष

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड(मॅक्स मंथन डेली न्यूज) : राज्यात वाहन चोरीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी RTO विभागाने High Security Registration Plates (HSRP) बसवणे अनिवार्य केले आहे. नागरिकही या प्रक्रियेत सहभागी होत आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच व्यक्तीला आपल्या दुचाकीसाठी दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट मिळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे राज्य सरकारचा कारभार किती ढिसाळ आहे, हे दिसून येत आहे, आणि नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

राज्य शासनाने नवीन नंबर प्लेट बसवण्याचे कंत्राट एका विशिष्ट कंपनीला दिले आहे. त्यामुळे नंबर प्लेट नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पाडली जात आहे. नागरिक नंबर प्लेटसाठी पूर्ण पैसे भरतात आणि दिलेल्या वेळेनुसार (appointment) नंबर प्लेट बसवून घेतात. परंतु, पिंपळे गुरव परिसरात राहणारे महेश आगम यांनी त्यांच्या दुचाकीसाठी ऑनलाइन नंबर प्लेट नोंदणी केल्यानंतर त्यांना कंपनीकडून दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट मिळाल्या.

आगम यांच्या दुचाकीच्या पुढील बाजूला MH 14 BN 8927 क्रमांकाची नंबर प्लेट आहे, जो त्यांचा मूळ आणि अधिकृत क्रमांक आहे. तर मागील बाजूला MH 20 BN 8927 क्रमांकाची चुकीची नंबर प्लेट देण्यात आली आहे. या गोंधळामुळे संतप्त झालेल्या आगम यांनी RTO प्रशासनाच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नागरिकांना मिळालेले दोन्ही क्रमांक वेगवेगळे असणे, ही राज्य सरकार आणि त्यांनी कंत्राट दिलेल्या कंपनीची गंभीर चूक आहे, असे नागरिक म्हणत आहेत. “आम्ही जेव्हा नंबर प्लेट बसवण्यासाठी गेलो, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. नंबर प्लेट बसवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काही वेळातच नंबर प्लेट दुरुस्त करून देतो, असे सांगितले. मात्र, राज्य सरकारने अशा कंपन्यांना काम दिल्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी नंबर प्लेट बसवताना नागरिकांशी वाद घातले जात आहेत,” असेही काही नागरिकांनी सांगितले.

या प्रकरणी पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव म्हणाले, “RTO कार्यालयाकडून कधीही चुकीचा वाहन क्रमांक दिला जात नाही. या घटनेत, नंबर प्लेट छापणाऱ्या संबंधित कंपनीची चूक असण्याची शक्यता आहे. नंबर प्लेटचे पॅकेजिंग करताना कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून नजरचुकीने असे घडले असण्याची शक्यता आहे. संबंधित वाहनचालकाने कंपनीला याबद्दल माहिती दिल्यास, त्यांना नंबर प्लेट बदलून मिळेल.”

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!