news
Home मावळमहाराष्ट्र मातंग समाजाचा ‘आक्रोश’! उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मुंबईत महामोर्चा!

मातंग समाजाचा ‘आक्रोश’! उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मुंबईत महामोर्चा!

दुर्बळ घटकांना न्याय मिळवण्यासाठी २० मे पासून तीव्र आंदोलनाचा इशारा!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मुंबई (मॅक्स मंथन डेली न्यूज): अनुसूचित जातींमधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य आक्रमक झाला आहे. समाजाच्या वतीने येत्या २० मे २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानात दुपारी १ वाजता ‘आक्रोश महाआंदोलन’ आयोजित करण्यात आले आहे.

या आंदोलनाचा केंद्रबिंदू अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून ते तातडीने, म्हणजेच जून २०२५ पासून लागू करण्याची मागणी आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की, उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमधील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या घटकांना शिक्षण, शासकीय नोकरी आणि सरकारी योजनांचा थेट लाभ मिळू शकेल.

सकल मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, अनेक लहान लहान उपगट राज्य सरकारच्या विविध योजनांपासून आणि आरक्षणाच्या प्रत्यक्ष लाभांपासून वंचित आहेत. त्यामुळे, आरक्षणाचा खरा हक्क सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण करणे आता अपरिहार्य आहे.

या ‘आक्रोश महाआंदोलना’ला विविध क्षेत्रातील मान्यवर नेते आणि लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळत आहे. आंदोलनात विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार सुनील कांबळे, आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार मधुकरराव घाटे, माजी आमदार नामदेव जयराम ससाणे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री दिलीप कांबळे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांच्यासह अनेक प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.

याव्यतिरिक्त, दलित महासंघाचे नेते मच्छिंद्र सकटे, मारुती वाडेकर, अशोक लोखंडे, राम चव्हाण यांसारखे ज्येष्ठ नेतेही आंदोलनात सक्रिय भूमिका घेणार आहेत.

आंदोलकांनी राज्य सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर सरकारने तातडीने आरक्षणाचे उपवर्गीकरण करून समाजाला न्याय दिला नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. आमदार अमित गोरखे यांनी समाजातील बांधवांना येत्या मंगळवारी आझाद मैदानावर होणाऱ्या या महत्त्वपूर्ण आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

आता या मागणीवर सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!