पिंपरी चिंचवडमध्ये कमी उत्सर्जन क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय कार्यशाळा! (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी-चिंचवड)
ब्रिटिश उच्चायुक्त आणि महापालिकेचा संयुक्त उपक्रम; लंडनच्या मॉडेलवर आधारित अंमलबजावणी.
पिंपरी, २ जून २०२५: पिंपरी चिंचवड शहरात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि ब्रिटिश उच्चायुक्त, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज कमी उत्सर्जन क्षेत्र (Low Emission Zones – LEZ) योजनेच्या नियोजन आणि अंमलबजावणीवर आधारित एका तांत्रिक कार्यशाळेचा शुभारंभ झाला.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि ब्रिटिश उच्चायुक्त जेमी स्कॅटरगुड यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त अण्णा बोदडे यांच्यासह महापालिकेचे अनेक अधिकारी, ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी आणि लंडनच्या ट्रान्सपोर्ट फॉर लंडनचे (TfL) तज्ञ उपस्थित होते.
२ ते ६ जून २०२५ या पाच दिवसांच्या कार्यशाळेत TfL चे तज्ञ मार्गदर्शन करणार असून, पिंपरी चिंचवड महापालिकेला कमी उत्सर्जन क्षेत्र धोरणाच्या अंमलबजावणीसाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल. कार्यशाळेत नियोजन, अंमलबजावणी, जनजागृती, तंत्रज्ञान आणि विविध संबंधितांशी संवाद यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे, लंडनमधील यशस्वी अल्ट्रा लो इमिशन झोनच्या (ULEZ) अनुभवावर आधारित हे प्रशिक्षण असेल. ही कार्यशाळा महापालिकेच्या लो इमिशन मोबिलिटी झोन्स (LEMZ) धोरणाला अधिक बळकटी देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
ट्रान्सपोर्ट फॉर लंडनसोबतची ही भागीदारी पिंपरी चिंचवड महापालिकेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम अनुभवांकडून शिकण्याची संधी देत आहे. विशेषतः शहरातील वायुप्रदूषणाची अचूक मोजणी करणे, नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम चालवणे, तांत्रिक अंमलबजावणी करणे आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवणे यासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
हा उपक्रम यूके-इंडिया पार्टनरिंग फॉर एक्सलरेटेड क्लायमेट ट्रान्झिशन निधीच्या माध्यमातून चालवला जात आहे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ हवा मोहिमेला पूर्णपणे सहाय्यक आहे. महापालिकेच्या ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’मध्ये या योजनेचा समावेश करण्यात आला आहे. महापालिकेच्या लो इमिशन मोबिलिटी झोन धोरणानुसार, २०२६ पर्यंत शहरातील निवडक भागांमध्ये केवळ BS-6 मानकांचे आणि इलेक्ट्रिक वाहनेच वापरण्याची परवानगी देण्याचे नियोजन आहे.
पुढील चार दिवसांच्या कार्यशाळेत कमी उत्सर्जन क्षेत्राच्या धोरणाला एकत्रित शहरी विकासाशी जोडणे, पादचारी आणि सायकलसारख्या वाहतुकीला प्रोत्साहन देणे, इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचे उद्दिष्ट साधणे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी प्रभावी समन्वय साधणे यावर विस्तृत चर्चा होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. ट्रान्सपोर्ट फॉर लंडनचे सहकार्य यासाठी मोलाचे ठरेल. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शहरातील कमी प्रदूषण क्षेत्रे निश्चित करून प्रभावी अंमलबजावणी करणे शक्य होईल. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका.
स्वच्छ आणि आरोग्यदायी शहरे बनवणे हे ब्रिटन आणि भारत सरकारचे समान उद्दिष्ट आहे. यूके पॅक्ट आणि ट्रान्सपोर्ट फॉर लंडनच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड महापालिकेने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. स्थानिक पातळीवरील भागीदारी जागतिक हवामान बदलाच्या लढाईत कशी मदत करू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. – जेमी स्कॅटरगुड, ब्रिटिश उच्च उपायुक्त, मुंबई