news
Home पिंपरी चिंचवड कष्टकरी संघर्ष महासंघाचा लढा अधिक तीव्र: कामगारांना थेट लाभ द्या आणि वैद्यकीय सुविधांचा गोंधळ थांबवा!

कष्टकरी संघर्ष महासंघाचा लढा अधिक तीव्र: कामगारांना थेट लाभ द्या आणि वैद्यकीय सुविधांचा गोंधळ थांबवा!

महामंडळाकडून कामे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यावर आक्षेप; सागर तायडे, काशिनाथ नखाते, राजकुमार होळीकर, प्रशांत मेश्राम यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

बांधकाम कामगारांच्या हक्कासाठी राज्यभर मेळावे घेण्याचा निर्धार!

 

बदलापूरमध्ये २ दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न; समस्या त्वरित न सुटल्यास आंदोलनाचा इशारा.

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. १८ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्या, प्रश्न आणि हक्कांसाठी आता विविध जिल्ह्यांमध्ये मेळावे आणि सभा घेऊन जनजागृती करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती आणि कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

राज्यभरातील बांधकाम कामगारांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. प्रशिक्षण शिबिरात अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले व मागण्यांसाठी आवाज उठवण्यात आला:

  • विलंब टाळा: माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेले असतानाही निवडणूक आयोग आणि महामंडळ निवडणुकीच्या काळात कामे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवत असल्यामुळे पुढील महिन्यांवर ताण येत आहे, तो टाळण्यात यावा.

  • पडताळणी प्रक्रिया: कामगारांना पडताळणीसाठी असणारी दररोज ४० ची संख्या वाढवून १०० करण्यात यावी.

  • थेट लाभ: बांधकाम कामगारांना योजनांचे लाभ थेट बँक खात्याद्वारे (DBT) देण्यात यावेत आणि पडताळणी जलद करून तातडीने लाभ देण्यात यावेत.

  • समिती रद्द करा: लोकप्रतिनिधीच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणारी समिती ही कामगार संघटनांवर गदा आणणारी असल्याने ती तात्काळ रद्द करावी.

  • वैद्यकीय सुविधा: कामगारांना योग्य वैद्यकीय सुविधा मिळत नसून, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये केवळ हॉस्पिटलचे बिल लाटण्याचा प्रकार सुरू आहे. कामगारांना तातडीने उपचार न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शिबिरात देण्यात आला.

या शिबिरामध्ये समिती अध्यक्ष सागर तायडे, महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, समिती कार्याध्यक्ष राजकुमार होळीकर, अकोल्याचे प्रशांत मेश्राम, ठाण्याचे प्रभाकर शिंदे, नवी मुंबईच्या विनीता बाळेकुंद्री, संभाजीनगरचे कमलेश दाभाडे, अशोक जाधव, साताऱ्याचे सागर कुंभार, सोलापूरचे ज्ञानेश्वर देशमुख, लातूरचे अजय कांबळे, ठाणेचे सुनील अहिरे, भंडाराचे मंगेश मोव्हे, धाराशिवचे शुभम गायकवाड, विशाल कांबळे, भंडाराचे पवन कोरतरे, मंगळवेढ्याचे प्रदीप परकाळे, नांदेडचे सुमन अग्रवाल, हिंगोलीचे नितिन घोडके, परभणीचे अशोक वाघमारे, नागपूरचे प्रमोद चव्हाण, निमंत्रक रविकांत सोनवणे, अनिल भालशंकर, मनिष शेडगे, संतोष खरात, दत्तात्रय शिरसाठ आदींसह राज्यातील बांधकाम कामगार संघटनांचे पदाधिकारी, अध्यक्ष आणि सचिव उपस्थित होते.

यावेळी जिल्हा प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी मान्यवरांकडून व अनुभवी पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. लवकरच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये सभा आणि बैठका घेण्याचा निर्धार करण्यात आला. शिबिरात सुनील अहिरे आणि अशोक जाधव यांनी चळवळीचे गीत सादर करून उत्साह निर्माण केला. सूत्रसंचालन प्रशांत मेश्राम यांनी केले तर आभार राजेश माने यांनी मानले.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!