कामगारांवरील अन्यायकारक ४ श्रम संहिता त्वरित रद्द करा! चिंचवडमध्ये काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन
‘भांडवलदार सोनेरी घडीला, कामगार देशोधडीला’ – कष्टकरी संघर्ष महासंघाची टीका
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. २८ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
केंद्र सरकारने लागू केलेल्या कामगारांवरील अन्यायकारक ४ श्रम संहिता (Labour Codes) त्वरित रद्द करा, या मागणीसाठी कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्राच्या वतीने आज (दि. २८ नोव्हेंबर २०२५) चिंचवड येथील थरमॅक्स चौक येथे कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केंद्र सरकारवर कठोर टीका केली. ते म्हणाले, “देशाची आणि राज्याची कामगार शक्ती, श्रमशक्ती यांचे योगदान मोठे आहे. देशभरातील कामगार संघटनांनी लढून संघर्षामधून निर्माण केलेले ४४ कायदे रद्द करून कामगारांना देशोधडीला लावणारे हे ४ श्रम संहिता त्वरित रद्द करण्यात यावेत.”

नखाते यांनी आरोप केला की, सरकार भांडवलदारांना प्रोत्साहन देत असून, सध्या देशात ‘भांडवलदार सोनेरी घडीला, कामगार देशोधडीला’ अशी स्थिती आहे.
-
नोकऱ्या संपणार: केंद्र सरकारचे ‘इज ऑफ डूइंग बिझनेस’ (Ease of Doing Business) धोरण उद्योजकांना पायघड्या घालत आहे. जाहिरातींमध्ये कामगारांचे कल्याण करण्याचे दावे केले जात असले तरी, प्रत्यक्ष कायमस्वरूपी काम आणि नोकऱ्या संपणार आहेत.
-
संघटनात्मक अस्तित्व नष्ट: संघटनांचे अस्तित्व संपवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आधी न्यायालय ठरवत असलेली कामगार संघटना आता व्यवस्थापनाचे लोक ठरवणार, ज्यामुळे कामगार गुलामगिरीकडे जात आहेत.
-
कामाचे तास वाढले: कामाचे ८ तासांवरून १२ तास करण्यात आले असून, कारखानदारांना मोकळीक देण्यात आली आहे.
-
न्याय निवाडा लवादाकडे: आता कामगार न्यायालये नसतील, तर लवाद (Tribunal) न्याय निवाडा करणार, मग कामगारांना न्याय कसा मिळेल, असा प्रश्न नखाते यांनी उपस्थित केला.
-
कंत्राटीकरण आणि अधिकार: कंत्राटीकरण वाढवणारे कायदे रद्द करण्याची मागणी करत, नखाते म्हणाले की, नियुक्तीपत्र देणे म्हणजे कायमस्वरूपी काम नव्हे, तर कधीही काढण्याचा सरकारने दिलेला अधिकार आहे. कष्टकरी कामगारांना सामाजिक सुरक्षा केवळ दिशाभूल म्हणून दाखवण्यात आली आहे.
शेतकरी, कामगार यांच्यासाठी लढणारे महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनी (२८ नोव्हेंबर) कष्टकरी कामगारांनी आंदोलन सुरू करण्यापूर्वी महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
‘कामगार अस्तित्व आंदोलनात’ कामगारांनी “हम सब – एक है!”, “कामगारांचे अस्तित्व नष्ट करणाऱ्या ४ श्रम संहिता रद्द करा”, “कामगारावरील जुलमी कायदे रद्द करा!”, “स्थिर नोकऱ्या नाकारणारे कायदे रद्द करा!” अशा घोषणा देऊन आपला आवाज बुलंद केला.
उपस्थित मान्यवर व कामगार:
या आंदोलनात कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, निमंत्रक सचिन नागणे, महानगरपालिका सदस्य किसन भोसले, किरण साडेकर, प्रदेश तुषार घाटोळे, महिलाध्यक्षा रुक्मिणी जाधव, सचिन भोसले, लाला राठोड, शमशुद्दीन शेख, सखाराम केदार, रोहन मुरगुंड, विशाल कसबे, शहनाज शेख, गीता माने, कांचन चव्हाण, बेबी राजगुरू, सुनिता भैरमडग, मोनिका पटेल, मंगला म्हैसणे, गजानन मांडे आदिसह पुणे जिल्ह्यातील कामगार बहुसंख्येने सहभागी झाले होते.
कामगार या भयानक परिस्थितीतून जात असताना पुढील काळात महाराष्ट्र आणि देशातील कामगारांनी क्रांती करून उठण्याची गरज आहे. मुंबई व दिल्ली येथे होणाऱ्या भविष्यातील आंदोलनात कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही काशिनाथ नखाते यांनी केले.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
