मुळशीत ‘पुणे ग्रँड चॅलेंज’मध्ये सायकलपटूंचा थरार; अरुंद रस्त्यामुळे ७० हून अधिक खेळाडूंचा भीषण अपघात
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २० जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुळशी : पुणे जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव आणि निष्काळजीपणाचा मोठा फटका आज ‘पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर’मधील खेळाडूंना बसला. मुळशी तालुक्यातील कोळवण रस्त्यावर अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने झालेल्या भीषण साखळी अपघातात ७० हून अधिक सायकलपटू जखमी झाले आहेत. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करताना खेळाडूंच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
‘पुणे ग्रँड चॅलेंज’ या स्पर्धेचे आयोजन पुणे जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले होते. मुळशीतील कोळवण रोडवरून ही स्पर्धा जात असताना, एका ठिकाणी रस्त्याची रुंदी अचानक कमी झाली आणि तीव्र वळण आले. ताशी ६० ते ७० किमी वेगाने धावणाऱ्या आघाडीच्या सायकलपटूचा या वळणावर ताबा सुटला. वेग जास्त असल्याने मागील सायकलपटूंना सावरण्याची संधीच मिळाली नाही आणि एकापाठोपाठ एक ७० हून अधिक खेळाडू एकमेकांवर आदळले.
अनेक खेळाडू सायकलवरून ट्रॅकच्या बाहेर फेकले गेले, तर काहींना गंभीर दुखापत झाली आहे. जखमी खेळाडूंना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ६० किमी वेगाने सायकली धावत असताना प्रशासनाने रस्त्यांवरील संभाव्य धोके, अरुंद रस्ते आणि वळणांची पाहणी का केली नाही? तसेच अशा ठिकाणी सुरक्षिततेचे बॅरिकेड्स किंवा सूचना फलक का लावले नाहीत? असे संतप्त सवाल आता खेळाडू आणि क्रीडा प्रेमींकडून विचारले जात आहेत.
या घटनेनंतर मुळशी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले असले तरी, जखमी खेळाडूंच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एका मोठ्या क्रीडा महोत्सवाचे रूपांतर अपघाताच्या थरारात झाल्याने आयोजकांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


