मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाला मिळणार बळ! उपमहापौर शर्मिला बाबर यांचे स्तुत्य पाऊल; हार-पुष्पगुच्छाऐवजी ‘मस्ती की पाठशाळा’साठी द्या शैक्षणिक साहित्य
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, ११ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या नवनिर्वाचित उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सामाजिक बांधिलकी जपणारा एक आदर्श निर्णय घेतला आहे. उपमहापौर पदाच्या शुभेच्छा देण्यासाठी येताना नागरिकांनी हार, पुष्पगुच्छ किंवा इतर भेटवस्तू आणू नयेत. त्याऐवजी बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या ‘मस्ती की पाठशाळा’ या उपक्रमातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून द्यावे, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले आहे.
रावेत येथे ‘मस्ती की पाठशाळा’ हा विशेष उपक्रम राबविला जातो. बांधकाम स्थळावर (Construction Site) काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय या माध्यमातून केली जाते. सध्या या प्रकल्पांतर्गत ६० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मुलांच्या हाती वह्या-पेन दिल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, या भावनेतून शर्मिला बाबर यांनी हा निर्णय घेतला आहे.
उपमहापौर शर्मिला बाबर यांनी नागरिकांना खालील वस्तू शैक्षणिक साहित्य म्हणून देण्याची विनंती केली आहे:
-
स्कूल बॅग आणि वॉटर बॅग
-
रायटिंग पॅड आणि पाट्या
-
पेन, वह्या आणि इतर शालेय साहित्य
“हार आणि पुष्पगुच्छ काही काळापुरतेच राहतात, पण शैक्षणिक साहित्य या चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी कायमस्वरूपी आधार ठरेल. नागरिकांनी औपचारिक शुभेच्छांपेक्षा या मुलांच्या शिक्षणात योगदान देऊन सामाजिक जबाबदारी पार पाडावी,” असे मत शर्मिला बाबर यांनी व्यक्त केले. महापौरांपाठौपाठ आता उपमहापौरांनीही अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे शहरात त्यांच्या या संवेदनशील भूमिकेचे जोरदार स्वागत होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
