मद्यधुंद होमगार्डचा राळेगावात राडा; भररस्त्यात दुचाकी आडवी लावून वाहतूक रोखली, पोलिसांच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी: नरेश राऊत, दिनांक: ५ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:
राळेगाव: शहराच्या हृदयस्थानी असलेल्या क्रांती चौक ते रावेर पॉईंट या मुख्य रस्त्यावर शनिवारी सकाळी एका मद्यधुंद होमगार्डने घातलेल्या गोंधळामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली. या प्रकारामुळे रुग्ण घेऊन जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला असून, पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर राळेगावकरांनी संताप व्यक्त केला आहे.
शनिवारी सकाळी ११:३० च्या सुमारास, जेव्हा बाजारपेठेत नागरिकांची मोठी वर्दळ होती, तेव्हा एका मद्यधुंद होमगार्डने आपली मोटारसायकल थेट रस्त्याच्या मध्यभागी उभी केली. यामुळे कापड बाजार, बँका आणि मेडिकल परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
याच वेळी प्रवीण येंगडे हे आपल्या वृद्ध वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र, संबंधित मद्यधुंद होमगार्डने त्यांच्या चारचाकी वाहनासमोर मुद्दाम दुचाकी आडवी लावली. येंगडे यांनी विनंती केली असता, होमगार्डने त्यांना भररस्त्यात अश्लील शिवीगाळ करत गैरवर्तन केले. या धक्कादायक प्रकारामुळे उपस्थितांमध्ये संतापाची लाट उसळली.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दंडे आणि बीट जमादार गोपाल वॉस्टर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, “रक्षकाच भक्षक” बनल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. यापूर्वी पोलीस निरीक्षक संजय खंदारे यांच्या काळात शहरातील वाहतूक शिस्तीत होती, मात्र त्यांच्या बदलीनंतर राळेगावची वाहतूक व्यवस्था वाऱ्यावर सोडल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
“जे कायदा पाळायला लावतात, तेच जर मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असतील, तर न्याय कोणाकडे मागायचा?” असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. या मद्यधुंद होमगार्डवर कठोर कारवाई करून पोलीस प्रशासनाने आपली प्रतिमा सुधारावी, अशी मागणी जोर धरत आहे. जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


