news
Home अकोला वाढदिवस आणि सेवानिवृत्तीचा दुर्मिळ योग! होमगार्ड सेक्शन लीडर रामभाऊ वानखडे यांना निरोप देताना सहकाऱ्यांचे डोळे पाणावले

वाढदिवस आणि सेवानिवृत्तीचा दुर्मिळ योग! होमगार्ड सेक्शन लीडर रामभाऊ वानखडे यांना निरोप देताना सहकाऱ्यांचे डोळे पाणावले

'माणसाने इतरांशी चांगले वागावे' म्हणत रामभाऊ झाले भावूक; अकोला पोलीस दलातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सोहळा संपन्न | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

३८ वर्षांच्या सेवापर्वाचा समारोप! मूर्तीजापूर होमगार्डचे सेक्शन लीडर रामभाऊ वानखडे सेवानिवृत्त; वाढदिवस आणि निरोप समारंभाने अधिकारी हेलावले

 

 

 

अकोला/मुर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे, दिनांक: ६ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

मूर्तीजापूर (अकोला): अत्यंत कर्तव्यदक्ष आणि मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे मूर्तीजापूर होमगार्ड पथकातील सेक्शन लीडर रामभाऊ दयाराम वानखडे यांचा सेवानिवृत्ती सोहळा रविवारी (५ एप्रिल) भावपूर्ण वातावरणात पार पडला. अकोला जिल्हा होमगार्ड समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक मा. रेड्डी सर यांच्या आदेशानुसार आणि तालुका समादेशक दिलीप नाईक यांच्या संकल्पनेतून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, काल रामभाऊंचा वाढदिवस आणि सेवानिवृत्ती असा दुर्मिळ योग जुळून आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व.प.ना. उषा वानखडे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून पलटण नायक संतोष महल्ले, महादेव नेमाडे, राहुल तोडकर, गजानन चव्हाण, अक्षय चिकणे आदी उपस्थित होते. कंपनी सार्जेंट मेजर गजानन चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात रामभाऊंच्या कार्याचा गौरव करताना म्हटले की, “तुमच्यासारखे व्यक्तिमत्व संघटनेतून सेवानिवृत्त होणे ही आमच्यासाठी ‘कभी खुशी कभी गम’ अशी अवस्था आहे.”

रामभाऊ वानखडे १९८८ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी होमगार्ड संघटनेत दाखल झाले होते. त्यांनी आपल्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत केवळ विदर्भातच नव्हे, तर तेलंगणा, मध्य प्रदेश, मुंबई, नागपूर आणि नाशिकच्या कुंभमेळ्यासारख्या ठिकाणी अत्यंत चोख सेवा बजावली. माना पोलीस स्टेशन येथे होमगार्ड इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी महामार्गावरील अनेक अपघातग्रस्तांचे प्राण वाचवून आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय दिला होता.

आपल्या निरोप समारंभात बोलताना रामभाऊ भावूक झाले. “या संघटनेने मला भरपूर काही दिले. जो संघटनेत भरती होतो, तो कधीतरी सेवानिवृत्त होतोच; पण माणसाने इतरांशी असे वागावे की सेवानिवृत्तीनंतरही लोक आपल्याशी जोडलेले राहतील,” असे सांगताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हे पाहून उपस्थित अनेक पुरुष व महिला होमगार्ड सैनिकांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.

यावेळी मूर्तीजापूर पथकातील अधिकाऱ्यांच्या वतीने रामभाऊंना शॉल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून जल्लोषही करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मूर्तीजापूर पथकातील सर्व अधिकारी, पुरुष व महिला होमगार्ड सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोला जिल्हा कार्यालयाचे पोहरे सर, डोंगरे सर, असोलकर सर, आघाव सर आणि देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!