आम आदमी पार्टीत मोठी फूट; राघव चड्ढा यांच्यासह ७ खासदार भाजपमध्ये दाखल
नवी दिल्ली, २५ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
नवी दिल्ली: देशातील सर्वात तरुण राष्ट्रीय पक्ष असलेल्या आम आदमी पार्टीला (AAP) शुक्रवारी आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे राज्यसभेतील माजी उपनेते राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली एकूण सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, राज्यसभेतील पक्षाच्या १० पैकी ७ (दोन तृतीयांश) खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षांतर बंदी कायद्याच्या तांत्रिक कचाट्यातूनही त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली आहे.
या गटामध्ये राघव चड्ढा यांच्यासह पक्षाचे मुख्य रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे आयआयटीचे प्राध्यापक संदीप पाठक यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या अन्य खासदारांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. राघव चड्ढा
२. संदीप पाठक
३. अशोक मित्तल (लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक)
४. हरभजन सिंग (माजी क्रिकेटपटू)
५. राजिंदर गुप्ता (उद्योजक)
६. विक्रमजीत साहनी (उद्योजक)
७. स्वाती मालीवाल (माजी अध्यक्ष, दिल्ली महिला आयोग)
नवी दिल्लीतील ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब’मध्ये पत्रकारांशी बोलताना राघव चड्ढा म्हणाले की, “ज्या पक्षाला मी १५ वर्षे रक्त आणि घाम देऊन सिंचले, तो पक्ष आता आपल्या मूळ तत्वापासून आणि नीतिमत्तेपासून भरकटला आहे. मला जाणवले की मी एका चुकीच्या पक्षात असलेला योग्य माणूस आहे. आम्हाला भ्रष्टाचार आणि गुन्ह्यांचा भाग व्हायचे नव्हते, म्हणूनच आम्ही संविधानातील तरतुदींनुसार भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे.”
पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा महत्त्वाच्या काळात पक्षाचे पंजाबमधील सहा खासदार आणि महत्त्वाचे नेते भाजपमध्ये गेल्यामुळे आप’ची मोठी कोंडी झाली आहे. स्वाती मालीवाल यांनीही एक्स (X) वर पोस्ट करत केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारावर कडाडून टीका केली आहे.
दुसरीकडे, आम आदमी पार्टीचे राज्यसभा नेते संजय सिंह यांनी ही बंडखोरी फेटाळून लावत राज्यसभेच्या सभापतींकडे या खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, बंडखोरांची संख्या दोन तृतीयांश असल्याने तांत्रिकदृष्ट्या हा गट भाजपमध्ये विलीन होऊ शकतो, असे घटनातज्ज्ञांचे मत आहे.
या मोठ्या राजकीय भूकंपामुळे दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणात नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

