news
Home पिंपरी चिंचवड धीरेंद्र शास्त्रींच्या ‘त्या’ विधानावरून पिंपरीत संताप! मानव कांबळे यांनी सत्ताधाऱ्यांना झापले

धीरेंद्र शास्त्रींच्या ‘त्या’ विधानावरून पिंपरीत संताप! मानव कांबळे यांनी सत्ताधाऱ्यांना झापले

"शिवरायांच्या नावाने गळा काढणारे नेते आता गप्प का?" ज्येष्ठ समाजसेवकांचा संतप्त सवाल | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींचा धिक्कार; राज्य सरकारच्या मौनावर मानव कांबळे कडाडले

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २६ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नागपूर येथील कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर ज्येष्ठ समाजसेवक आणि शिव-फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे नेते मानव कांबळे यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून, धीरेंद्र शास्त्रींसह राज्य सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला आहे.

नागपूर येथे झालेल्या एका धर्मसभेत धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना, “महाराज सततच्या युद्धाने थकले होते आणि त्यांनी आपले राजपाट समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली होती,” असे विधान केले. ऐतिहासिक पुराव्यांचा आधार नसलेले हे विधान शिवप्रेमींच्या जिव्हारी लागले असून, यावरून आता राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.

मानव कांबळे यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या मौनावर कडक ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले, “अरे, कुठे आहे तो वाचाळवीर आमदार संजय गायकवाड? कुठे गेले नितेश राणे, संग्राम जगताप आणि महेश लांडगे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने गळा काढणारे एकनाथ शिंदे आणि ‘हे शिवरायांचे राज्य आहे’ असे म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मूग गिळून गप्प का आहेत?”

कांबळे यांनी पुढे संताप व्यक्त करताना म्हटले की, “तो भोंदू धीरेंद्र शास्त्री साक्षात मुख्यमंत्र्यांच्या समोर आमच्या आराध्य दैवताचा अपमान करून गेला आणि महाराष्ट्रातले स्वतःला शिवभक्त म्हणवणारे तथाकथित नेते गप्प बसले आहेत. आम्ही त्या धीरेंद्र शास्त्रीचा तर धिक्कार करतच आहोत, पण कोणतीही ठोस भूमिका न घेणाऱ्या या राज्य सरकारचाही जाहीर निषेध करतो.”

धीरेंद्र शास्त्रींच्या या विधानाला कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याचे अनेक इतिहासकारांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य करताना अशा विधानांचा इतिहासात दाखला नसल्याचे मान्य केले असले, तरी कडक कारवाईची मागणी होत आहे.

मानव कांबळे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील शिवप्रेमी संघटनांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, धीरेंद्र शास्त्रींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि दैवताचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी शिवप्रेमी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!