माणसाला माणूस म्हणून जगू देणे, हेच संतांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ विचार; कीर्तनकार ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज यांचे प्रतिपादन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २१ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “आजच्या काळात दुर्दैवाने माणसांपेक्षा दगडांना जास्त महत्त्व देणारा समाज वाढू लागला आहे. यामुळेच खऱ्या पुरोगामी वारकरी विचारांचा पराजय होत आहे. वास्तव पाहता वारकरी संप्रदाय म्हणजे समता, शांती, बंधुता आणि न्याय आहे. चालत्या-बोलत्या माणसाला माणूस म्हणून जगू देणे, हाच संतपरंपरेचा मुख्य गाभा होता आणि हाच विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानातून मांडला. संतांचे विचार आणि बाबासाहेबांचे आचरण हीच आपल्या समाजाच्या खऱ्या प्रगतीची वाट आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध प्रबोधनकार व कीर्तनकार ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज यांनी केले.
पिंपरी येथील विठ्ठलनगर पुनर्वसन वसाहतीमध्ये सम्यक स्वयंसेवा संस्थेच्या वतीने आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती महोत्सवात (दि. १९) मुख्य प्रबोधनकार म्हणून ते बोलत होते. या भव्य महोत्सवाचे नेटके आयोजन सम्यक स्वयंसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ बनसोडे, सदस्य ललिता बनसोडे, सिद्धांत बनसोडे, ज्योती बनसोडे व कौसल्या पंडित यांनी केले होते.
या सोहळ्याला पिंपरी-चिंचवडमधील विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये माजी नगरसेवक राहुल भाऊ भोसले, माजी नगरसवेिका वैशालीताई घोडेकर (लोंढे), ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, साम टीव्हीचे प्रतिनिधी पत्रकार गोपाल मोटघरे, सुनील उर्फ बाबू कांबळे, प्रवीण शिर्के, रोहित खरगे, अविनाश कांबीकर, माऊली भोसले, युनूस खतीब, विकास गायकांबळे, देवा भालके, भीमराव बरकडे, सोमनाथ काळे, मुख्याध्यापक आल्हाट, अभिमान सोनवणे, युवराज भास्कर, सैलाजात चौधरी, उर्वशी गाढवे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
कीर्तनादरम्यान बोलताना वाबळे महाराज यांनी महाराष्ट्राच्या प्रगल्भ वैचारिक परंपरेचा धागा जोडला. ते म्हणाले, “महात्मा फुले हे जगद्गुरु तुकोबारायांच्या वाटेवरून गेले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुल्यांच्या विचारांच्या पाऊलखुणावर चालले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही तुकोबांच्या विचारांचा वारसा जपत परकीय शाह्यांचा पाडाव केला आणि इथल्या बहुजन, तेली-तांबोळी, कुणबी समाजाला हक्काचे स्वराज्य मिळवून दिले.”
ज्ञानेश्वरीतील “तु मन हे मीचि करी, माझिये भजनीं प्रेम धरी” या ओवीचा अत्यंत सोपा अर्थ सांगताना महाराज म्हणाले की, ‘भजन’ म्हणजे केवळ टाळ-मृदंग वाजवणे नव्हे, तर ‘माणुसकीची सेवा’ करणे हा आहे. आज चालत्या-बोलत्या माणसाला पाण्यासाठी ताटकळत उभे केले जाते, मात्र दगडाच्या देवावर अडीच-अडीच लीटर दूध-दही ओतले जाते. देव हा दगडात किंवा तीर्थात नसून तो माणसाच्या सत्य आचरणात आणि चांगल्या चरित्रात असतो, हे गाडगेबाबांचे विचार आपण विसरता कामा नयेत.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी विलायतला गेले, परंतु त्यांनी कधीही तंबाखू, पानाच्या व्यसनाला शिवले नाही. त्यांचे वैयक्तिक आचरण अत्यंत शुद्ध होते म्हणूनच ते कोट्यवधी समाजाचा उद्धार करू शकले. ज्याचे आचरण शुद्ध नाही, त्याचा परमार्थ, राजकारण किंवा समाजकारण काहीच शुद्ध असू शकत नाही. जे पंचशीलाचे प्रामाणिकपणे पालन करतात, तेच खरे धम्माचे लोक आहेत आणि तेच खरे वारकरी आहेत,” असेही वाबळे महाराजांनी ठामपणे सांगितले. संत नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये जाऊन शीख बांधवांना जोडले, हा इतिहास सांगत वारकरी संप्रदाय समाज जोडणारा आहे, तोडणारा नाही, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “मी सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केले होते. परंतु जेव्हा मला तिथे प्रकर्षाने जातीभेद जाणवला, तेव्हा मी त्यातून बाहेर पडलो आणि चळवळीमध्ये सामील होऊन समाजहितासाठी काम करू लागलो. हा संयुक्त जयंतीचा प्रबोधनात्मक कार्यक्रम नक्कीच समाजाला नवी दिशा देईल.”
या सोहळ्याचे औचित्य साधून सामाजिक व आरोग्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये राईबाई वाघमारे, मस्के मामी, रानुबाई किसन डोंगरे, शिलाबाई अभिमान सोनवणे, मंदा वाळके, आशावर्कर मिराताई वाघमारे आणि सुवर्णा कांबळे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्याला ललिता बनसोडे, ज्योती बनसोडे, सिद्धांत बनसोडे, कौसल्या पंडित, अशोक शिखरे, माऊली बोराटे, सिद्धार्थ वंसाळे, रमेश कांबळे, दत्ताभाऊ गायकवाड, दिलीप पवार, सुरज गायकवाड, राहुल सोनवणे, लक्ष्मण जोगदंड, मुकुंद रणदिवे, प्रदीप टोपे, बी. बी. शिंदे, अशोक गायसमुद्रे, धुराजी शिंदे, दीपक भालेराव, सुधाकर इंगळे, रोहिदास वाघमारे, अशोक वाघमारे, रामभाऊ ठोके, गोविंद गाडे, राजा नायक उपस्थित होते.
यासोबतच परिसरातील अनेक नामांकित महिला बचत गटांनी यात सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये स्वप्नरुपी महिला बचत गट (विद्या जालिंदर खरात), आयुष्य महिला बचत गट (सुवर्णा लखन काकडे), आई महिला बचत गट (अध्यक्ष गवळण अशोक शिखरे), सम्राट महिला बचत गट (स्नेहलता पाटोळे), ममता महिला बचत गट (ज्योती शिंदे), आदिती महिला बचत गट (पूजा अशोक डोंगरे-पाटोळे), श्रद्धा महिला बचत गट (प्रवीण पठाण), तनिष्का महिला बचत गट (सारिका गायकवाड), खुशी महिला बचत गट (राणी हजारे-पाटोळे), भिमाई महिला बचत गट, रमाई महिला बचत गट, सावित्री महिला बचत गट, गौतमी महिला बचत गट, यशोधरा महिला बचत गट, अहिल्या महिला बचत गट आणि द्वारकाबाई महिला बचत गटाच्या शेकडो महिला व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


