लॉरेन्स बिश्नोई गँगला पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा दणका! फर्निचर मॉल मालकावर गोळीबार करणारे ३ शार्प शूटर हरिद्वारमधून गजाआड
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २१ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी फर्निचर मॉलच्या मालकावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. गुन्हे शाखेच्या गुंड विरोधी पथकाने (Anti-Goon Squad) आणि युनिट २ च्या टीमने थेट उत्तराखंडमधील हरिद्वार येथे धडक कारवाई करत लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ३ अट्टल शार्प शूटरना ताब्यात घेतले आहे. पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांच्या खून प्रकरणातील आरोपी कुलदीप उर्फ कशीश आणि बिश्नोई गँगचा सदस्य आरजू बिश्नोई यांच्या सांगण्यावरून हा गोळीबार झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मे २०२६ रोजी ए. जे. फर्निचर मॉलचे मालक जगदीश भेराराम बिश्नोई यांचे भागीदार अशोक कुमार बिश्नोई यांना आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांक +1 (912) 310-3107 वरून व्हॉट्सॲप कॉल आला होता. फोन करणाऱ्याने स्वतःला बिश्नोई गँगचा सांगत २ कोटी रुपयांची खंडणी मागितली व न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अशोक कुमार यांनी या धमकीला कोणताही प्रतिसाद दिला नाही व खंडणी देण्यास नकार दिला.
याचाच रागातून १५ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जगदीश बिश्नोई हे पुनावळे येथील रावेत-ब्रिटीश रस्ता, कुदाळे फार्म येथील ‘ए. जे. फर्निचर मॉल’च्या बाहेर बसले होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी बिश्नोई गँगचे हस्तक आरजू बिश्नोई आणि शुभम लोणकर यांच्या सांगण्यावरून पिस्तूलमधून जगदीश यांच्या दिशेने ५ ते ६ राऊंड थेट गोळीबार (Firing) केला व त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०९, ३०८(३), ३०८(५), ३०८(७), ३(५) सह भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शहरात झालेल्या या गंभीर गोळीबारानंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि सह-पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर यांनी समांतर तपासाचे आदेश दिले. तपासासाठी तब्बल ७ वेगवेगळी पथके तयार करण्यात आली, ज्यातील २ पथके परराज्यात पाठवण्यात आली.
गुंड विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संदीप सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने, पोलीस उपनिज्ञक समीर लोंढे, युनिट २ चे मयुरेश साळुंके आणि रावेतचे पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या पथकाने तब्बल ३५० ते ४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपी हरियाणातील रोहतक येथील असल्याचे समजले. पोलीस पथक रोहतक येथे ४ दिवस तळ ठोकून होते, मात्र आरोपी तेथून उत्तराखंडमधील हरिद्वार येथे पळून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी हरिद्वारमध्ये वेढा घालून तिघांना अटक केली.
परवीन रामनिवास (वय २२ वर्षे, रा. बेरी, झज्जर, हरियाणा – शिक्षण १० वी, बेरोजगार), पंकज कुलदीप (वय २१ वर्षे, रा. ककराना, कलानौर, जि. रोहतक, हरियाणा – शिक्षण १२ वी, आयटीआय, बेरोजगार), सागर अजयपाल (वय २१ वर्षे, रा. भैंसवाल कलन मिठान, सोनीपत, हरियाणा – शिक्षण १० वी, आयटीआय, बेरोजगार) या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, माननीय न्यायालयाने त्यांना २८ मे २०२६ पर्यंत (८ दिवस) पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्राथमिक तपासामध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हा गुन्हा बिश्नोई गँगचे सदस्य आरजू बिश्नोई, शुभम लोणकर आणि कुलदीप उर्फ कशीश यांच्या कटानुसार केल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, यातील कुलदीप उर्फ कशीश हा पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे. आंतरराष्ट्रीय गुंड आरजू बिश्नोई याने आपल्या हस्तकांमार्फत या शूटर्सना दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे, पैसे आणि वाहने पुरवली होती.
बिश्नोई टोळीचे जाळे शहरात पसरत असल्याचे आणखी एका घटनेवरून स्पष्ट झाले आहे. दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘वीर फर्निचर’च्या मालकालाही बिश्नोई गँगकडून फोनद्वारे खंडणी मागण्यात आली आहे. यापूर्वी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारे खंडणी मागितल्याप्रकरणी बिश्नोई गँगविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या दोन्ही घटनांमध्ये या अटक केलेल्या आरोपींचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. “गुन्ह्याचा कट रचणारे, त्याची अंमलबजावणी करणारे आणि आरोपींना आश्रय देणाऱ्या सर्व व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर मोक्का (MCOCA) अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा गुन्हे शाखेचे पोलीस उप-आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
